मळेवाड आरोग्य केंद्रात डॉक्टरची नेमणूक करा

अन्यथा आंदोलन छेडण्याचा ग्रामस्थांचा इशारा
Edited by: प्रतिनिधी
Published on: May 13, 2023 15:21 PM
views 171  views

सावंतवाडी : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात एम.बी.बी.एस. डॉक्टर पद त्वरित न भरल्यास २२ मे रोजी माजी पंचायत समिती सदस्य सीताराम ऊर्फ बाळा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्याचा इशारा मळेवाड-कोंडुरे ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठविले आहे.  

मळेवाड-कोंडुरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एस.बी.बी.एस. डॉक्टर पदाची नेमणूक झाली नसल्याने मळेवाड परिसरात गंभीर बाब निर्माण झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा मळेवाड आरोग्य केंद्राला वालीच नसल्याचे दिसून येते.

     येथे जबाबदार डॉक्टर नसल्याने गरोदर माता रुग्णालयात दाखल होत नाहीत. यापूर्वी मळेवाड प्रा. आ. केंद्रात गरोदर मातांना जागाच अपुरी पडत असे. शेतकरी वर्गाच्या गरोदर मातांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे त्वरित या ठिकाणी एम.बी.बी.एस. डॉक्टर पदाची नेमणूक करावी. डॉक्टरची भरती न झाल्यास सोमवारी (दि. २२) रोजी माजी पंचायत समिती सदस्य सीताराम ऊर्फ बाळा शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली मळेवाड कोंडुरे ग्रामस्थ आमरण उपोषण करणार आहेत.

तसेच प्रा. आ. केंद्र मळेवाड या ठिकाणी सन २०१२ ते २०२२ या कालावधीत शासनाचा निधी कोणत्या कामावर खर्च झालेला आहे त्याचीही माहिती मिळावी, असे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या पत्राची प्रत पालकमंत्री रवींद्र चव्हाण,  शिक्षणमंत्री दीपक केसरकर,  सावंतवाडी तहसीलदार,  पोलीस निरीक्षक, सावंतवाडी यांना पाठविली आहे.