पाणी उकळून पिण्याचं आवाहन..!

Edited by: विनायक गावस
Published on: June 17, 2023 12:27 PM
views 180  views

सावंतवाडी : पावसाळ्याच्या अनुषंगाने दुषित पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार तसेच डासांमुळे पसरणारे मलेरिया (हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. ते टाळण्यासाठी पिण्याचे पाणी गाळून, उकळून पिणे व किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास प्रतिबंधक उपाययोजना करणे, तापसदृश्य आजारांवर त्वरित वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे असे आवाहन डॉ. संदीप सावंत, वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रुग्णालय, सावंतवाडी यांनी केले आहे.

पावसाळ्यात पाणी साठे वाढून डासांचा प्रादुर्भाव वाढतो. मलेरिया (हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, हत्तीरोग यासारखे आजार डासांमार्फत पसरतात. तीव्र ताप, तीव्र थंडी, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे या आजारामध्ये आढळून येतात. त्यामुळे कोणतेही लक्षण दिसल्यास त्वरित रक्त तपासणी करणे व औषधोपचार घेणे आवश्यक आहे.

डासांची पैदास साठलेल्या व साठवलेल्या पाण्यात होते. अशा पाणीसाठ्यामध्ये डास अंडी घालतात. त्यातून अळ्या बाहेर पडून नंतर डास फैलावतात. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असे पाणीसाठे नष्ट करणे, साठलेले पाणी, डबकीवाहती करणे, साठलेल्या पाण्यात ऑईल टाकणे अथवा गप्पी मासे सोडणे तसेचभंगार साहित्य, टायर यासारख्या वस्तूमध्ये पाणी साठून डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते असे पाणीसाठे नष्ट करावेत. मच्छरदाणीचा वापर करणे, खिडक्या, दारे, संडासचे व्हेंटपाईप यांना जाळी बसवणे आदी उपाययोजना कराव्यात व कोणतेही तापसदृश्य लक्षण असल्यास त्वरित उप जिल्हा रुणालय, सावंतवाडी येथे तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.