
सावंतवाडी : पालकमंत्र्यांनी पोल बदलण्यापूर्वी या अधिकाऱ्यांना बदलावं. चांगले कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी आणावेत व कामचुकारपणा करणाऱ्यांना कामाला लावावे अशी मागणी असनिये ग्रामस्थांनी केली. तसेच पोलिस बोलवायचं कळत. पण, कामासाठीची गॅंग बोलवायला जमत नाही का ? असा सवाल उप कार्यकारी अभियंतांना करत खडेबोल सुनावले. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींच्या मध्यस्थीनंतर व कार्यकारी अभियंतांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तूर्त स्थगित केले.
असनियेतील प्रलंबित विविध वीज समस्यांबाबत अनेकवेळा लक्ष वेधूनही केवळ आश्वासने देणे व नाममात्र कार्यवाहीपलीकडे कोणतीही कार्यवाही झाली नाही. महावितरणचा या बेजबाबदारपणा व कर्तव्यशून्य कारभाराच्या विरोधात असनियेवासीयांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत रोष व्यक्त केला. ग्रामस्थांनी आपल्या समस्यांबाबत उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांना धारेवर धरत खडेबोल सुनावले. महावितरण खोटं बोलत आहे. लाईट बील भरल नाही तर घरापर्यंत येता. मग, आता लेखी आश्वासन देऊनही काम का करत नाही ? चीफ इंजीनियरकडून कामाचे आदेश दिलेले असताना काम का होत नाही ? वरिष्ठ सांगतात मटेरियल, काम करणारी गॅंग, अधिकारी वर्गाला सुचना दिलेल्या आहेत. पण, स्थानिक अधिकारी काम करत नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत यांनी केला.
दरम्यान, गावात लाईन पडून बैल मेला त्या ठिकाणी चार दिवसांपूर्वी लाईन बदलेली. झाड न पडता लाईन पडून बैल मेला, यावरून काम काय दर्जाचे होत हे लक्षात येत असंही ग्रामस्थ म्हणाले. पालकमंत्री नितेश राणे यांनी यांच्या कामाची चौकशी करावी. पहिली या अधिकाऱ्यांना बदलाव, नंतर पोल बदलावे ही आमची विनंती आहे. कोकणाविषयी आस्था असलेले अधिकारी असावेत. कोकणवासीयांविषयी यांना आस्था नाही त्यामुळे यांना कामाला लावा, हे कार्यालयात बसून असतात असंही ग्रामस्थ म्हणाले.
माणूस मरायची वाट बघत का ?
ग्रामस्थ म्हणाले, बैल मेल्यावर लिहून दिलेलं आश्वासन खोटं आहे. सगळे रिपोर्ट देतो असून सांगून आजपर्यंत एकही रिपोर्ट दिला नाही. आता पोलिसांकडून रिपोर्ट घेऊन या असं अधिकारी सांगत आहे. चार दिवसांत काम करण्याच आश्वासन दिलं अन् आता तुमच तुम्ही बघा असं सांगत आहे. माणूस मरायची वाट बघत का ? यावरून अधिकारी किती खोटारडेपणा करत आहेत हे लक्षात येत. अधिकारी फोन उचलत नाही. मंत्रालयापर्यंत हे पोहचले पाहिजे. आम्ही कोणाला विचारायचं, काय करायचं ? यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी उपस्थितांनी केली.
पोलिस बोलवायचं कसं कळत ?
महावितरणला पोलिसांना बोलवायच कळत. पण, दोन वर्ष तारा तुटून माणसं मरत असताना काम करणं जमत नाही. त्यासाठी टीम मागवायला जमत नाही. पण, पोलिस बोलवायचं कळत अशा शब्दांत असनिये ग्रामस्थांनी महावितरणच्या उप कार्यकारी अभियंताना सुनावलं.
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोवर जाणार नाही. लोक मरत आहेत. तुम्ही येणार आणि दुःख व्यक्त करून जाणार, तुमच्या दृष्टीने प्राणी, माणूस मेला तरी किंमत काहीही नाही. दोन वर्षांत तुम्ही पाहणी करू शकत नाही एवढं कसलं काम तुम्ही करता ? असा सवाल केला.
दरम्यान, मटेरीयल उपलब्ध होत आहे तस आम्ही काम करत आहोत. लोखंडी पोलची मागणी आम्ही केली आहे. अतिजलद असे १०० पोल तातडीने बदलण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. वातावरणामुळे अडथळे येत आहेत असे उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत समस्या सोडवण्यासाचे आश्वासन दिले. ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे महावितरण कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना बोलावून घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
यावेळी सरपंच रेश्मा सावंत, संदीप सावंत,जितेंद्र सावंत, राकेश सावंत, ओंकार सावंत,विठ्ठल ठिकार, दत्तप्रसाद पोकळे,समीर कोलते, शरद सावंत, दशरथ सावंत, सुधाकर घोघळे, भिकाजी नाईक, विजय सावंत, विद्या सावंत, विकास सावंत, अभिमन्यू सावंत, अमित सावंत, अनिल सावंत,रामचंद्र घोघळे, सोहम सावंत, श्रीधर सावंत, सुमन असणंकर, प्रसाद दामले, विलास ठिकार, लक्ष्मण सावंत, रत्नाकर सावंत, शौनक दामले, भिकाजी सावंत, ओंकार भुस्कुटे, विनायक कोळपते, गणपत सावंत, प्रवीण ठिकार, देवेंद्र सावंत, शैलेश खाडिलकर, बाळकृष्ण मेस्त्री, धोंडी सावंत, सतीश सावंत, उमेश पोकळे, सुभाष सावंत, विलास बर्वे, आनंद सावंत, दीपक पेडणेकर, ओंकार सावंत, न्हानु सावंत आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.