'जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा' सावंतवाडीत | MSW च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Edited by: भगवान शेलटे
Published on: October 12, 2023 11:11 AM
views 137  views

मुंबई :  20 ऑगस्ट 2023 रोजी पुण्यातून सुरुवात झालेली "जादूटोणा विरोधी कायदा राज्य संवाद यात्रा" आज सावंतवाडीतील मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उप परिसरामध्ये दाखल झाली. त्यावेळी "महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013" म्हणजेच "जादूटोणा विरोधी कायदा" याचे समाजकार्य विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका माया रहाटे यांनी केले. श्री. भगवान रणदिवे यांनी भोंदू बाबा लोकांना कशाप्रकारे फसवतात याचा एक नमुना म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन पाण्याने दिवा पेटवून झाले. नंदिनी जाधव यांनी जादूटोणा विरोधी कायदा विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. श्री भगवान रणदिवे यांनी कायद्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भोंदू बाबा करीत असलेले चमत्कार दाखवले आणि त्यामागील विज्ञान ही समजावून सांगितले उदा. पाण्याने दिवा पेटवणे या चमत्कारा मागे कॅल्शियम कार्बाइडचा खडा आणि पाणी यांच्यामध्ये प्रक्रिया झाल्याने ऍसिटिलीन नावाचा वायू तयार होतो जो अत्यंत ज्वलनशील असतो हे विज्ञान असल्याचे सांगितले. मिलिंद देशमुख यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मनाची तंदुरुस्ती देखील आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास मान्यवर म्हणून नंदिनी जाधव,  भगवान रणदिवे,  मिलिंद देशमुख, वंदना करंबेळकर आणि अनंत पवार हे लाभले. 

प्रा. पूनम गायकवाड यांनी "विवेक को कर बुलंद" असे म्हणून उपस्थित कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्ष विद्यार्थिनी रसिका आयरे हिने केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा.अमर निर्मळे यांचे सहकार्य लाभले व प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग यांचे मार्गदर्शन लाभले.