
वेंगुर्ला : अणसूर पाल हायस्कूल एसएससी १९९५-९६ बॅचचा स्नेहभेट कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी एकत्रिकरित्या जमा केलेली ५० हजार रूपयांची रोख रक्कम अणसूर पाल विकास मंडळा मुंबईकडे सुपूर्द करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरूवात शाळेची घंटा वाजवून व सर्व आजी-माजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे औक्षण करून पुष्पवृष्टीने करण्यात आले. माजी विद्यार्थी दिलीप मांजरेकर व शंभा परब यांनी गणेशवंदना, स्वागतगीत व ईशस्वतन सादर केले. माजी मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर व संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत शालेय परिवारातर्फे वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाच्या संदेशाचे प्रतिक म्हणून सुपारीचे रोपटे देऊन करण्यात आले.
माजी विद्यार्थी अभिजित गावडे यांनी स्नेहभेटीचा उद्देश प्रास्ताविकातून स्पष्ट केला. शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई, रत्नागिरी, सिधुदुर्ग, गोवा या विविध भागात नोकरी व्यवसायानिमित्त असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळा व गुरूजनांच्या विविध आठवणींना उजाळा दिला आणि तत्कलीन मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर, वर्गशिक्षिका शैलजा वेटे, इंग्रजी विषयक शिक्षिका अक्षता पेडणेकर-सातार्डेकर, मराठी व हिदी विषयाच्या शिक्षिका ऋतुजा सामंत, शाळा मुख्याध्यापक राजेश घाटवळ, शिक्षक विजय ठाकर, चारूता परब, शिक्षकेत्तर कर्मचारी सुधीर पालकर, जगदीश गावडे, रामचंद्र भोई, अशोक पालकर, किशोर पालकर यांचा शाल, श्रीफळ, शिवप्रतिमा व भेटवस्तू देऊन सन्मान केला.
शाळा, गुरूजनांचे ऋण फेडण्यापलिकडचे असून त्या ऋणात राहून गुरूजनांचे आशीर्वाद घेण्यातच खरे सुख असल्याचे उद्गार माजी विद्यार्थी अभिजित गवंडे, शंभा परब, दिलीप मांजरेकर, शिल्पा गावडे, नेत्रा पालकर आदींनी काढले. संपना गावडे, रामचंद्र मालवणकर, दिपावली सावंत, महेंद्र गावडे, वैजयंती गोडबोले, निला पालकर, मंगल गावडे, संतोष पालकर, सुदेश सावंत, संजय गावडे, नंदा देऊलकर, राकेश सावंत, रोहिणी राऊळ, कविता गावडे, मनोज गावडे, निलिमा बर्वे, सावळाराम लाड, ज्ञानेश्वर पालकर, प्रतिभा गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर माजी मुख्याध्यापक एम.जी.मातोंडकर यांनी अन्य माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेला स्नेहभेट देण्यासाठी आवाहन केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षिका शैलजा वेटे, अक्षता पेडणेकर-सातार्डेकर, राजेश घाटवळ यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. संस्थेच्यावतीने अध्यक्ष आत्माराम गावडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहभेटीबद्दल आणि शाळेला भरीवी आर्थिक देणगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.