दोडामार्ग : शिरवल बागवाडी येथील नागेश सावंत यांच्या घराच्या परिसरात तब्बल १२ फूट लांबीचा जगातील सर्वात विषारी किंग कोब्रा हा महाकाय साप आढळून आला. हा भला मोठा साप दिसताच तेथील ग्रामस्थांनी तात्काळ झोळंबे गावातील सर्पमित्र विठ्ठल गवस यांना याची माहिती दिली.
सर्पमित्र विठ्ठल गवस रा. झोळंबे घटनास्थळी पोहचल्यावर त्यांच्या लक्षात तो सर्वात जहरीला किंग कोब्रा साप असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तात्काळ कुडाळ येथील वनविभाग आरआरटी रँपिड रिस्पॉन्स टीमला याची माहिती दिली. टिमचे प्रमुख अनिल गावडे आणि वैभव अमृस्कर हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
तोपर्यंत विठ्ठल गवस यांनी लोकवस्तीत आलेल्या त्या किंग कोब्राचा यशस्वी बचाव करण्यात यश मिळवीले. साप मोक्याच्या ठिकाणी असल्याने लोकांचीही गर्दी झाली होती. मात्र मोठ्या धाडसाने व चपळाईने किंग कोब्रा या टीमने रिस्कयू करत त्याला जीवदान दिले. सर्पमित्र विठ्ठल गवस आणि जलद बचाव पथकाने असे साप किंवा वन्यजीव लोकवस्तीत आल्यास तात्काळ स्थानिक सर्पमित्र आणि वनविभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. नंतर त्या किंग कोब्राला वनविभाग अधिकाऱ्यांच्या समक्ष नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी सर्पमित्र विठ्ठल गवस, वनविभाग अधिकारी सुबोध नाईक, अनिल गावडे , वैभव अमृस्कर, महेश राऊळ, तुषार नाईक, निलेश सावंत उपस्थित होते.