
कणकवली : कणकवली जानवली येथे अंबर प्रोजेक्टमध्ये बंगला बांधून देतो असे सांगून शामल मंगेश तळदेवकर (रा. जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विनोद गिरधर परमार (४३, रा. भायखळा मुंबई) या आणखी एका संशयिताला पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई येथून गुरुवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सदर घटनेबाबत यापूर्वीच तेजस सागर घाडीगावकर (३६. रा. भायखळा- मुंबई) व इलटन पीटर नहोना (३८, रा. वरळी-मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. यातील तेजस याच्याकडून एक टाटा सफारी कारही जप्त करण्यात आली आहे. तर घटनेप्रकरणी आणखीही एक संशयित असून त्यालाही लवकरच अटक करणार, असे उपनिरीक्षक हाडळ यांनी सांगितले.