
मुंबई : तपास यंत्रणांनी उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका दिला आहे. ठाकरेंचे विश्वासून आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांना भ्रष्टाचारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नोटीस दिली आहे. ज्यांना नोटिसा पाठवल्या आहेत त्यांची आजच चौकशीसाठी बोलावलं आहे.
एसीबीच्या नोटिशीनंतर राजन साळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, "एसीबीनं या प्रकरणात माझी चारवेळा चौकशी केली आहे. आता ते माझ्या भावाची, वहिणीची आणि पत्नीची आज आणि उद्या चौकशी करणार आहेत. पण काहीही झालं तरी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेन, मी भित्रा नाही"
जेव्हा मला पहिल्यांदा नोटीस मिळाली, त्याचदिवशी मी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी मला सांगितलं की, लढत राहा मी तुमच्यासोबत आहे, अशा शब्दांत राजन साळवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं. आज अधिवेशनात सहभाग घेऊन कुटुंबियांसह चौकशीसाठी जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेनेत फूट झाल्यानंतर आपण अद्यापही उद्धव ठाकरेंसोबत असल्यानं माझ्याविरोधात हे कारस्थान रचलं आहे. मी किती स्वच्छ आहे हे माझ्या मतदारसंघातील सर्वांना माहिती आहे, त्यामुळं मी या कारवायांना घाबरत नाही, असंही साळवी यांनी म्हटलं आहे.