बाल शिवाजी स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

नॅशनल रेफ्री स्काऊट गाईड आदर्श शिक्षक नॅशनल पुरस्कार विजेते दिनेश सावंत यांच्या हस्ते झालं उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 19, 2022 10:34 AM
views 285  views

कणकवली : बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या सेक्रेटरी सौ .सुलेखा राणे यांनी  भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दिनेश सावंत, नॅशनल रेफ्री स्काऊट गाईड आदर्श शिक्षक नॅशनल पुरस्कार विजेते लाभले होते. क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम विद्यालयाच्या क्रीडा पटांगणामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन नारळ फोडून, मशाल पेटवून केले.

महोत्सवात विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये लंगडी, कबड्डी खो-खो, रिले रेस, क्रिकेट , बॅडमिंटन, बुक बॅलेंसिंग सॅक रेस, बुद्धिबळ, कॅरम याप्रमाणे अनेक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. खेळ खेळून झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सुवर्ण, कास्य व रौप्य  असे तीन प्रकारचे पदक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळाचे महत्त्व समजावून उत्तम खेळाडू कसे व्हावे, याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात शाळेच्या दहावीच्या विद्यार्थिनींनी  उपस्थित विद्यार्थ्यांचे, शिक्षक, प्रमुख पाहुणे व सर्वांचे आभार मानले.