...अन्यथा सावंतवाडीसह अन्य रेल्वे स्थानके सेल्फी पॉईंट जाहीर करा ; पुंडलिक दळवी

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 18:04 PM
views 106  views

सावंतवाडी : रेल्वे स्थानके सुशोभीकरण करण्यासाठी कोटयावधीचा निधी खर्च करण्यापेक्षा त्या ठिकाणी जास्तीत जास्त लांब पल्ल्याच्या गाड्या कशा थांबतील यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावे अन्यथा सावंतवाडीसह अन्य रेल्वे स्थानके सेल्फी पॉईंट म्हणून जाहीर करावीत असा टोला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी लगावला आहे.

या ठिकाणी सुशोभीकरणाचे काम सुरू असताना दुसरीकडे मात्र प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात गवत आहे त्या ठिकाणी उभ्या राहणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर छत नाही,पिण्याच्या पाण्याची समस्या आहे त्यामुळे प्रथम या महत्त्वाच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर श्री दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरण करण्याच्या कामाला आमचा विरोध नाही परंतु त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा  प्रवाशांना मिळणे गरजेचे आहे. आत सुविधा नाही आणि बाहेर सुशोभीकरण असले तर त्याचा उपयोग काय असा सवाल त्यांनी केला आहे.

सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री हे व्हीजन असलेले नेते आहे त्यामुळे त्यांनी नुसती सुशोभीकरण करण्यापेक्षा या ठिकाणी वंदे भारत सारख्या लांब पल्ल्याच्या जास्तीत जास्त गाड्या कशा थांबतील याकडे लक्ष द्यावे अन्यथा  सुशोभीकरण करण्यात येणारे सावंतवाडीसह अन्य  रेल्वे स्टेशन फक्त सेल्फी पॉईंट ठरतील असा टोला  त्यांनी लगावला आहे.