दोडामार्ग शहराचं आराध्य दैवत ; श्री पिंपळेश्वर देवस्थानचा वर्धापनदिन उत्साहात

Edited by: लवू परब
Published on: April 09, 2026 16:48 PM
views 11  views

दोडामार्ग :  दोडामार्ग शहराच्या बाजारपेठ येथे असणारे आराध्य दैवत श्री पिंपळेश्वर देवस्थानचा 19 वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपूर्ण शहरासहित तालुक्यातील तसेच बाहेरील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाले होते. संपूर्ण दोडामार्ग बाजारपेठ आज अक्षरशः "पिंपळेश्वरमय "झाली होती.

वझरे येथील प्रसिद्ध भटजी श्री. दामले यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यनारायण महापूजेचे सकाळच्या सत्रात आयोजन करण्यात आले होते. येथील बाजारपेठेतील शुभम अनिल सांबारी व दिक्षिता शुभम सांबारी या दाम्पत्याने पूजेसाठी यजमानपद भूषविले. त्यानंतर संपन्न झालेल्या आरती, तीर्थप्रसाद तसेच महाप्रसाद शिवाय गाऱ्हाणी, नवससाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सायंकाळच्या सत्रातील भजनाचा तसेच रात्रीचे आयोजित कोकणी नाटक यांना देखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.