नगराध्यक्षपदासाठी अन्नपूर्णा कोरगावकरांनी कंबर कसली

मतविभाजनाचा भाजपला फटका ?
Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2025 14:22 PM
views 560  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत माजी उप नगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहाराचा सर्वांगीण विकास घडवायला मी सक्षम आहे. आता माघार घेणार नाही. सावंतवाडीकर आपल्याला आशीर्वाद देत विजयी करतील असा विश्वास देखील सौ. कोरगावकर यांनी व्यक्त केला‌. 

अपक्ष उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडे त्यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली होती.‌ प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंची त्यांनी भेट घेतली होती. आपली मुलाखत झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांना डावललं गेल्यानं बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात सध्या डोअर टू डोअर जात त्या आपला प्रचार करत आहेत. समर्थकांसह त्यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सौ. कोरगावकर या उच्चशिक्षित, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, ग्रामीण, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व्यवसायात यशस्वी व सदैव जन संपर्कात असणाऱ्या  उमेदवार आहेत. जनता त्यांना निश्चितच साथ देईल असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला. त्यांची कन्या सौ. ऐश्वर्या कोरगावकर व चिरंजीव अखिलेश कोरगावकर यांनीही इतर प्रभागात वैयक्तिक गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यावेळी व्यंकटेश शेट यांसह सौ. कोरगावकर यांचे समर्थक उपस्थित होते. 

सौ. कोरगावकर या भाजपच्या समर्थक आहेत. नगरसेवक पदासाठी भाजपन तिकीट नाकारल्यानंतर देखील त्या अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. तदनंतर भाजपला पाठिंबा देत उपनगराध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. यामुळे त्यांच्या रूपाने होणाऱ्या मतविभाजनाचा फटका शहरातील भाजपला तसेच शिवसेनेलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.