अनिकेत पाटणकर यांच्या तातडीच्या रक्तदानाने वाचले रुग्णाचे प्राण

Edited by: विनायक गांवस
Published on: September 17, 2025 16:57 PM
views 81  views

सावंतवाडी : गोवा बांबोळी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या सावंतवाडीच्या एका रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी B+ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता असताना 'युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी'च्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला. संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी तात्काळ गोवा बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले, ज्यामुळे रुग्णाचे प्राण वाचले.

सावंतवाडी येथील रहिवासी असलेले प्रदीप पोकळे यांना उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना तातडीने 'फ्रेश' रक्ताची गरज होती. ही माहिती मिळताच, 'युवा रक्तदाता संघटने'चे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी या घटनेची दखल घेतली. त्वरित मदतीसाठी नियोजन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी तात्काळ गोवा गाठले. गोव्यातील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या वेळेवर केलेल्या सहकार्यामुळे रुग्णाला रक्ताचा पुरवठा त्वरित झाला आणि शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली. रुग्णाचे नातेवाईक आणि कुटुंबीयांनी रक्तदाता श्री. पाटणकर आणि 'युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी' यांचे विशेष आभार मानले आहेत. गरजूंना वेळेवर मदत करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल सर्वत्र  संघटनेचे कौतुक होत आहे.