
सावंतवाडी : असनिये-वायंगणवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा विद्युत भारित वीज वाहिनी कोसळून एक बैल जागीच ठार झाला. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जीर्ण वीज वाहिनीसह विद्युत खांब बदलण्याबाबत रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पाच तास आंदोलन करत छेडले.
यावेळी येत्या सोमवारी याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर हे आंदोलन मागे घेतले. गावातील प्रलंबित समस्याबाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत संतप्त असनियेवासियांनी आंदोलन छेडले. जोपर्यंत गावातील सुरळीत वीजपुरवठ्यासह जीर्ण वीज वाहिनी व विद्युत खांब बदलण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घेतली. यावेळी तणाव निर्माण झाल्यामुळे बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ ठोस आश्वासनाअभावी आपल्या भूमिकेवर ठाम होते. तब्बल पाच तास हे आंदोलन सुरू होते. अखेर सावंतवाडीचे उप अभियंता शैलेंद्र राक्षे यांनी येत्या सोमवार पासून गावातील जीर्ण वीज वाहिनी व विद्युत खांब बदलण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र याच वेळी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कामात सुरुवात न केल्यास बुधवारी १६ जुलै रोजी सावंतवाडीत महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.