सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतच्या निष्क्रिय व भोंगळ कारभाराबाबत संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतला लॉक केले. ऐन चतुर्थीतच स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीस धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतला लॉक ठोकले. यावेळी उपस्थित असलेले सरपंच हनुमंत पेडणेकर यांना जाब विचारला.
नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत सातत्याने पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतच्या हद्दीत विविध समस्या प्रलंबित असल्याबाबत संताप व्यक्त केला. तर तेरा पैकी एकही ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने 'असले सदस्य काय कामाचे? साऱ्यांचा राजीनामा घ्या अस मत व्यक्त करत नागरिकांनी घोषणाबाजी केली. ग्रामस्थांच्या या रोषाला सरपंच हनुमंत पेडणेकर एकटेच सामोरे गेले. आपले एकही सदस्य उपस्थित नसल्याने त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले की, मळगाव ग्रामपंचायतीत अनेक समस्या प्रलंबित आहेत. ज्यामुळे मळगाव ग्रामस्थ त्रस्त आहेत. गेले वर्षभर आम्ही सर्व ग्रामस्थ मळगाव ग्रामपंचायतच्या निष्क्रिय कारभाराला अक्षरशः वैतागलो आहोत. सहा महिन्यापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत. ग्रामस्थांना अंधारातून चाचपडत जावे लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळातही स्ट्रीट लाईट लावू शकले नाहीत. फक्त लाईट कर गोळा करत आहेत. पिण्याचे पाणीचे बिल घेतले जाते. परंतु नळाला पाणीच येत नाही. रस्त्यांची तर अत्यंत दुरावस्था आहे. गटार तुंबलेले आहेत, गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली आहेत. परिणामी वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. अशा अनेक समस्यांचा पाढा त्यांनी यावेळेस सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्यासमोर वाचून दाखवला.
याबाबत समन्वयाने व शांतपणे आपण प्रश्न सोडवू, असे सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी सांगितले. यावेळी मळगाव येथील पांडुरंग राऊळ, बाप्पा नाटेकर, ॲड. निधी दाभोळकर, महेंद्र पेडणेकर, गुरुनाथ गावकर, विलास मळगावकर, गुरुनाथ नार्वेकर, सिद्धेश तेंडुलकर, विश्वनाथ गोसावी, बाळा बुगडे, निलेश राऊळ, प्रेमनाथ राऊळ, लाडू जाधव ,संजय जाधव, महेश शिरोडकर, मयूर गावकर, ज्ञानेश्वर राऊळ लाडकोबा गावकर उल्हास मांजरेकर राजेश राऊत राकेश राऊळ ज्ञानेश्वर मळगावकर दिलीप कानसे शंकर राऊळ, दीपक मळगावकर, महेश राऊळ, सोना गावकर, राजू नाईक, दिनेश नाईक, पांडुरंग नाटेकर, राजाराम शिरोडकर, सुधाकर तेली, अमोल सावळ, प्रितेश दाभोळकर, सुधाकर नाईक, प्रणव सावळ, कांता सावळ, जयेंद्र जाधव, जयराम राऊळ, विलास जाधव, दीपक जाधव, समीर हरमलकर यांसह शेकडो ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.