
वैभववाडी : तळेरे-कोल्हापुर मार्गावरील नाधवडे सरदारवाडी येथे खड्डे बुजविण्याचे सुरू असलेले काम निकृष्ट असल्याचा आरोप करीत संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी काम बंद पाडले. निकृष्ट कामामुळे काम बंद पाडण्याचा हा दुसरा प्रकार आहे. जोपर्यंत संबंधित विभागाचा सक्षम अधिकारी उपस्थित राहत नाही तोपर्यंत काम सुरू करायचे नाही, असा इशारा माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांनी ठेकेदाराला दिला आहे. नेहमीच्या या प्रकारामुळे हा मार्ग सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे.
तळेरे-कोल्हापुर मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असुन हा मार्ग वाहतुकीस धोकादायक बनलेला आहे. या मार्गावरील घाटरस्त्याची तर दुरावस्था झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासुन या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे बुजविण्याचे काम निकृष्टपणे सुरू असल्याचा आरोप करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी दहा दिवसांपुर्वी भैरीभवानी पेट्रोलपंपासमोर रोखले होते. त्यानंतर काही अंशी कामात सुधारणा झाली होती. त्यानंतर आज नाधवडे सरदारवाडी येथे खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. खड्डे बुजविण्यासाठी डांबराचा वापरच होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, पप्या पाटणकर, रविंद्र वारीक, संतोष पेडणेकर, महेश गोखले, पुडलिंक साळुंखे, साक्षी कदम, कविता इस्वलकर आदीनी बंद पाडले. काम दर्जेदार करायचे नसेल तर करू नका, असा इशारा श्री. नकाशे यांनी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना दिला. खड्डयामुळे वाहनचालक गेले कित्येक महिने हैराण झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे किमान आता खड्डे भरण्याचे काम तरी दर्जेदार व्हायला हवे, असे मत सुधीर नकाशे यांनी व्यक्त केले. निकृष्ट काम आम्ही खपवुन घेणार नाही.