आंगणेवाडी यात्रा 22 फेब्रुवारीला

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 12, 2024 08:22 AM
views 381  views

मालवण : आंगणेवाडी यात्रेची तारीख निश्चित झाली असून  22 फेब्रुवारी 2025 ला आंगणेवाडी भराडी देवीचा वार्षिकोत्सव होणार आहे. देवीला कौल लावल्या नंतर आज सकाळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने यात्रेची तारीख जाहीर केली. 

नवसाला पावणारी आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील  आंगणेवाडीतील श्री भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चीतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. गावातील मुंबईस्थित चाकरमानी तर यात्रेच्या तारखेकडे डोळे लावून असतात. डिसेंबर महिना आला कि मुंबईस्थित चाकरमानी, मित्रमंडळी आपआपल्या नातेवाईकांना सतत संपर्क ठेवून असतात. तारीख निश्चित झाली कि यात्रेत येण्यासाठी तिकीट बुकिंग साठी गर्दी, सुट्टी करिता धडपड करत असतात. काही  दिवसांपूर्वी पारध करण्यात आली होती. त्यानंतर धार्मिक विधी केल्यानंतर आज सकाळी मंडळाच्या वतीने आंगणेवाडी यात्रा  22 फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहिर करण्यात आले. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या या यात्रोत्सवात यावर्षीही १० ते १५ लाखाहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज बांधण्यात येत आहे. आंगणेवाडी मंडळ तसेच जिल्हाप्रशासन तालुका प्रशासनाकडून यात्रा नियोजनास लवकरच सुरवात होणार आहे.