नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रोत्सवाची तारीख ठरली

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 03, 2025 10:24 AM
views 399  views

मालवण : नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक जत्रा निश्चित झाली आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ही जत्रा होणार आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती दर्शवतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली आहे. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात. आता आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागणार आहे. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळा बरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. जत्रेच्या तारीख ठरविण्याचा कौल झाल्या नंतर श्री देवी भराडी मंदिर ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे.