
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन, विक्री आणि यासंबंधीचे अवैध धंदे आवरता येत नाहीत, अशी सातत्याने नागरिकांकडून तक्रार होत असतानाच आता वैद्यकीय क्षेत्रानेही पुढाकार घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व नामांकित डॉक्टरांनी एकत्र येत इंडियन मेडिकल असोसिएशन,सिंधुदुर्ग च्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. यात गांजा - चरस यासारख्या पारंपरिक व्यसनांबरोबरच एमडीएमए, एक्स्टसी आणि अन्य आधुनिक ड्रग्सचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आल्याने युवकांचे भविष्य वाचविण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्याच या पुढाकाराने आता जिल्ह्यातील कायदा अंमलबजावणी यंत्रणेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनीही या पार्श्वभूमीवर पोलिसांना स्पष्ट इशारा दिला आहे. गुरुवारी दोडामार्ग येथे बोलताना त्यांनी अमली पदार्थ, अवैध दारू वाहतूक व विक्री तसेच जुगार याविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी, असा ठाम पवित्रा पुन्हा जाहीर केला. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केल्याशिवाय मी गप्प बसणारा नाही. प्रसंगी “माझी धाड पडणार नाही याची खबरदारी घ्या,” असा थेट इशारा त्यांनी खाकी वर्दीला देत पोलिस प्रशासनाने यापुढे कोणतीही सबब न सांगता ठोस कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केलेय.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रग्स, चरस, गांजा यांचा वापर फारसा नाही,” असे खाजगीत सांगून जबाबदारी झटकणाऱ्या काही अधिकाऱ्यांनाही यानिमित्ताने राणेंनी लक्ष्य केले. यातच डॉक्टर संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जिल्ह्यातील युवा पिढीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने आता खाकीला कारणे सांगण्यास जागा राहिलेली नाही. खाकीतील काहीं कर्तव्यदक्ष अधिकारी यांना याविरोधात कडक कारवाई करायची आहे. मात्र वरिष्ठ यांचा दबाव आणि न्यायालयीन बाबी यामुळे अशा कारवाईत ताब्यात घेतलेल्या संशयितांना न्यायालयासमोर उभं करून तुरुंगात डांबणे ही बाब आव्हानात्मक व त्रासदायी असल्याने असे सकारात्मक अधिकारी नाविलाजास्तव मनात असूनही कारवाईस धजावत नाहीत. खाजगीत बोलताना खाकीतीलच काहीनी ही बाब निदर्शनास आणून दिली. उलट यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून जिल्हा पोलीस प्रशासनाने उचलली पाहिजेत. “युवकांच्या भवितव्यासाठी अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करणे, हा जिल्हा पोलिसांचा प्राथमिक ध्यास असायला हवा. मागेपुढे न पाहता कार्यवाही झाली पाहिजे.
नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन, सिंधुदुर्ग या डॉक्टरांच्या संघटनेने निवेदनातही युवकांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे. अमली पदार्थांचे व्यसन हे केवळ वैयक्तिक नव्हे तर सामाजिक आरोग्यासाठीही संकट निर्माण करणारे आहे, असे नमूद करून याविरुद्ध जनजागृती मोहिमांसह पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर छापे घालून पुरवठा साखळी तोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरिक, पालकवर्ग तसेच शैक्षणिक संस्थांनीही या मोहिमेत सहभाग घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. वैद्यकीय क्षेत्रातून आलेल्या या ठोस भूमिकेमुळे अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक व्यापक होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालकमंत्री राणे यांच्या इशाऱ्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासन आता सज्ज होण्याची गरज निर्माण झाली आहे. अमली पदार्थांसह अवैध दारू वाहतूक व जुगार याविरोधात काटेकोर कारवाई होईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. युवकांचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी सर्व यंत्रणा एकवटून कामाला लागणे हीच काळाची गरज असल्याचा सूर सर्वत्र उमटतो आहे. हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्या पालकमंत्री यांचा थेट ग्राऊंडवरील आक्रमकपणा खाकीने कणकवलीत अनुभवला आहेच. त्यात पुन्हा दोडामार्गमध्ये इशारा दिल्याने, आणि जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर वर्गाने आता खाकीच्या वर्मावर थेट बोट ठेवल्याने धडक कारवाईशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही.
चौथा स्तंभ
संदीप देसाई,
संपादक, दै. कोकणसाद










