आंगणेवाडी जत्रेच्या नियोजनाचा मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 20, 2025 17:39 PM
views 248  views

मालवण : स्थानिक देवस्थान समितीला सरकारकडून आवश्यक ती मदत दिली जाईल. भाविकांना सुलभ दर्शन देताना कोणताही अनुचित प्रकार, अवैध धंदे होणार नाही यासाठी प्रशासनास आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. आंगणेवाडी यात्रेला दरवर्षी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता वीज वितरण, मोबाईल नेटवर्क, आरोग्य, पाणीपुरवठा, यासह आवश्यक महत्वाच्या सर्व समस्यांवर पुढच्या यात्रेपर्यंत कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठकीत दिली. 

आंगणेवाडी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज सकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडीत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

यात्रेला दोन दिवस राहिले तरी वीज वितरणचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. काल काही काळ वीज पुरवठा खंडित झाल्याने नितेश राणे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. प्रत्येक वेळी बैठकीला वेगवेगळे अधिकारी उपस्थित असतात असे सांगत वीज वितरण अधिकाऱ्यांनी धारेवर धरले. सर्व कामे उद्या दुपार पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना ना. राणे यांनी दिल्या. तसेच यात्रा कालावधीत आंगणेवाडीतच थांबण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेऊन बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे कोलमडलेली असते. त्यामुळे टॉवरची क्षमता वाढवावी. इंटरनेट सुविधा सुरळीत व्हावी यासाठी त्याचीही क्षमता वाढविण्यात यावी. जिओ नेटवर्क बाबत चर्चा झाली. मात्र, जिओचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. 

आपत्ती काळात गर्दीतून रुग्णवाहिका जाण्यासाठी आणि लवकरात लवकर बाहेर जाण्यासाठीचा मार्ग यावर आरोग्य विभाग आणि आरटीओ यांनी संयुक्त बैठक करून त्यावर नियोजन करण्यात यावे. तसेच व्हीआयपी आल्यावर सर्व सामान्यांना त्रास होता नये याचीही खबरदारी घेण्यात यावी अशी सूचना राणे यांनी प्रशासनास केली. 


अवैध धंदे बंद करा : 

यात्रेत अवैध धंदे आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात यावी. ग्रामस्थ मंडळाने सुद्धा काही निदर्शनास आल्या तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. सर्व अवैध धंदे बंद व्हायला पाहिजेत असेही राणे यांनी सांगितले. 


महत्वाची कामे कायमस्वरूपी मार्गी लावू : 

आंगणेवाडी यात्रा जवळ आली कि दरवर्षी ग्रामस्थ मंडळाकडून अनेक मागण्या केल्या जातात. वीज वितरण, बिएसएनएल, आरोग्य, पाणीपुरवठा यासंह इतर महत्वाचे कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येतील. पुढच्या वर्षीच्या यात्रेला हे महत्वाचे विषय कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येतील. प्रत्येक वेळी मागणी करायची गरज पडणार नसल्याचे राणे म्हणाले.