...तर BSNLच्या कार्यालयाला घेराव घालणार : सुधीर राऊळ

Edited by: विनायक गावस
Published on: July 10, 2023 16:16 PM
views 127  views

सावंतवाडी : मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्कची लवकरात लवकर  सुरळीत मोबाईल नेटवर्कची सुविधा द्या. अन्यथा मनसे या मोबाईल ग्राहकांना घेऊन बीएसएनएल कार्यालयाला घेराव घालून आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे सुधीर राऊळ यांनी दिला आहे. मोबाईल ग्राहकांनी राऊळ यांच्याकडे तक्रार केली होती. यावेळी राऊळ यांनी हा इशारा दिला.

राऊळ म्हणाले, मळगाव पंचक्रोशीत बीएसएनएल नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा सुरु आहे. तीन दिवस झाले बीएसएनएल नेटवर्क नसल्यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नुकताच कुठे पावसाळा सुरु झाला. मात्र पहिल्या पावसातच बीएसएनएल नेटवर्कचा खेळखंडोबा सुरु झाला आहे.  वरचेवर बीएसएनएल नेटवर्कची ये-जा सुरु असते आणि अधिकारी मात्र हातावर हात ठेवून आपले काम करत असतात. त्यामुळे त्यांना गावातील कुठे काय झाल  हे माहिती असुन सुध्दा ते याकडे लक्ष देत नाहीत. हे अधिकारी लोकांना फक्त त्रास द्यायचा काम ऑफिसमध्ये बसुन करत असतात. सिंधुदुर्गातील डोंगरपट्टीतल्या गावातील एकूण १२५  बीएसएनएल टॉवर नेटवर्क अभावी बंद आहेत. त्यामुळे येथील ग्राहक त्रस्त झाले आहेत आणि त्यांचा बाहेरील आपल्या लोकांशी संपर्क तुटत आहे, त्यामुळे ते हैराण झाले आहेत.

खासदार आमदार हे लोकांच्या त्रुटी बघून काम करत नाहीत तर लोकांना गृहीत धरून आपले सोईस्कर राजकारण खेळतात हे अधिकारी आपला पगार घेऊन मस्त आहेत. जेवढे दिवस टॉवर बंद असते तेवढे दिवस मोबाईल मध्ये नेटवर्क नसते त्यामुळे लोकांच्या रिचार्जचे पैसे फुकट जातात, हे पैसे देणार कोण, असा सवाल राऊळ यांनी केला आहे.

मात्र हे अधिकारी लोकांची मजा बघतात. लोकांना त्रास देण बंद करा आणि लवकरात लवकर तुमच्या काय असतील त्या त्रुटी शोधून लोकांना सुरळीत मोबाईल नेटवर्कची सुविधा द्या. अन्यथा मनसे या मोबाईल ग्राहकांना ग्रामस्थांना  आंदोलन छेडेल, असा इशारा राऊळ यांनी दिला आहे.