आनंदोत्सव कार्यक्रमात जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यशाळा

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 17, 2024 13:23 PM
views 40  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सरस्वती एज्युकेशन सोसायटी,सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र व छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ते 19 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिजामाता संकुल ओरोस येथे आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला.


माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव चालू आहे. या महोत्सवामध्ये जलजीवन मिशन व स्वच्छ भारत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद पाणी व स्वच्छ विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक ठाकूर हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणे हा मानवाचा प्राथमिक हक्क आहे पाणी हेच आपले खरे जीवन आहे म्हणून पाण्याचे योग्य प्रकारे संवर्धन वापर होणे गरजेचे आहे. प्रत्येक घराला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी शासन नियोजन करून त्याची अंमलबजावणी करत आहे.

प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करावा व त्याचे संवर्धन करावे जेणेकरून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान विभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शिवाजी राठोड , द्वितीय क्रमांक मिळवलेले परुळे बाजार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शरद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अधिकारी श्री. प्रवीण काणकेकर व संतोष पाटील यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी गौरव करण्यात आला. या महोत्सवामध्ये भरडधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन विनायक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. भरडधान्य पाककला स्पर्धेमध्ये एकूण 25 महिलांनी भाग घेतला होता. कार्यशाळेमध्ये जलजीवन मिशन योजनेची सविस्तर माहिती निवृत्त कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. कार्यक्रमाला उद्योजक किरण सामंत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक नितीन वाळके उपस्थित होते.कार्यशाळेला जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रमुख बाळकृष्ण गावडे, श्री. भास्कर काजरेकर, डॉ. विलास सावंत,विकास धामापूरकर, डॉ. केशव देसाई विवेक सावंतभोसले, सुमेधा तावडे ,छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, स्फूर्ती प्रकल्पाचे समन्वय यशवंत पंडित,संस्थेचे संचालक, श्री.सुनील देसाई, नैसर्गिक शेतीच्या प्रगतशील शेतकरी सौ. प्रतिभा नाईक भालेकर व प्राध्यापक उपस्थित होते. दुपारच्या सत्रामध्ये भरड धान्य पिक लागवड तंत्रज्ञान विषयावर स्फूर्तीच्या बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांना नैसर्गिक कृषी निविष्ठा निमित्त त्यांचे प्रात्यक्षिक दाखवून प्रक्षेत्रावर शिवार फेरी आयोजित करण्यात आली.