
सावंतवाडी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर आज यश मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. आज पहाटे सरकारनं त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगितल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. सावंतवाडीत देखील मराठा समाज बांधवांनी आनंदोत्सव साजरा करत मोठा जल्लोष केला. यावेळी आजच्या निर्णयासाठी सरकारचं अभिनंदन करत असतानाच भविष्यात सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी हा लढा सुरुच राहणार असल्याचं विधान याप्रसंगी उपस्थित मराठा समाजाच्या नेत्यांनी केल.
ऐतिहासिक राजवाड्यासमोर तालुक्यातील मराठा समाजाकडून जल्लोष करण्यात आला. फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव मराठा समाजानं साजरा केला. याप्रसंगी जरांगेंच्या नेतृत्वाखाली सगळा मराठा समाज एक आला. आज पहिल्या टप्प्यास यश आल असून पुढच्या टप्प्यासाठी आता लक्ष केंद्रित केल जाणार आहे. आजच्या निर्णयासाठी महाराष्ट्र सरकारच कौतुक करतो असं मत यावेळी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले यांनी व्यक्त केलं.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, महाराष्ट्र सरकार व जरांगे पाटील यांच अभिनंदन करतो. आज कुणबी मराठा जीआर काढला गेला आहे. यामुळे जवळपास ५७ लाख लोकांना त्यांचे सगेसोयरे आदींना याचा लाभ मिळणार आहे. हा लढा आता सकल मराठा समाजासाठी कायम राहणार आहे. तर कायद्याचा चौकटीत टिकणारा निर्णय सरकारने घेतला आहे. क्युरेटीव्ह पिटीशनमध्ये देखील याला यश मिळाव. कोणत्याही समाजाच आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नकोय ही भूमिका पहिल्यापासून आहे. त्या दृष्टीने तो निकाल लागावा असं प्रतिपादन समाजाचे नेते विकास सावंत यांनी केल.
दरम्यान, सामान्य माणूस पेटून उठला की काय घडत हे जरांगेंच्या माध्यमातून दिसून आल. सकल मराठा समाजाने जरांगेंना साथ दिली. आज या लढ्यामुळे सरकारला नमाव लागले. कुणबी मराठा बांधवांना आरक्षण मिळाले महणून आज जल्लोष करत आहेत. भविष्यात सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा लढा कायम रहिल असं विधान सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी व्यक्त केले. आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. मराठा बांधवांच्या लढ्याला यश आले असून दिल्लीच तक्त हलविण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे उद्गार महिला नेत्या अर्चना घारे- परब यांनी काढले. तर मनोज जरांगेंच्या मागे करोडोंच्या संख्येने मराठा समाज उभा आहे. त्यांच्या लढ्यासह मराठ्यांच्या एकजूटीला आज यश मिळाले आहे असं मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केल. अभिषेक सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत-भोंसले, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, मराठा समाजाचे नेते विकास सावंत, महिला नेत्या अर्चना घारे-परब, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे, पुंडलिक दळवी, उमाकांत वारंग, विलास जाधव, अशोक दळवी, खेमराज कुडतरकर, सतिश बागवे, अमोल सावंत, अभिजीत सावंत, राजू तावडे, दत्ता सावंत, लवू भिंगारे, अजय सावंत, सुर्यकांत राऊळ, विनायक सावंत, सी.एल.नाईक, एल.एम. सावंत, भारती मोरे, सौ. सावंत, पुजा दळवी आदींसह मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते.