
वेंगुर्ला : तालुक्यातील म्हापण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जय हनुमान गाव विकास पॅनेल मळई प्रभाग २ मधून ३ उमेदवार निवडून आणत आनंद गावडे खऱ्या अर्थाने 'किंगमेकर' ठरले आहेत. म्हापण उपसरपंच निवडीवेळी आनंद गावडे यांच्या पॅनेलची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
म्हापण ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी वेळी खरी रंगतदार ठरली ती म्हणजे प्रभाग २ मढील लढत. या प्रभागामध्ये जय हनुमान गाव विकास पॅनेल, मळईमधून तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी तिन्ही उमेदवार हे बहुमताने निवडून आणत येथील माजी सरपंच आनंद गावडे हे 'किंगमेकर' ठरले आहेत.
खऱ्या अर्थाने भाजपचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले आनंद गावडे हे काही दिवसांपासून स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे त्यांनी या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल उभे करायचे ठरवले. त्यातूनच त्यांनी जय हनुमान गाव विकास पॅनेल मळई मधून आपले ३ उमेदवार रिंगणात उतरवले. समोर दोन पॅनेलचे तगडे आव्हान असताना देखील, त्याला न जुमानता आपली रणनीती आखत, प्रतिष्ठा पणाला लावत त्यांनी आपल्या पॅनेलचे श्रीकृष्ण ठाकूर, गुरुप्रसाद चव्हाण व सिया मार्गी या तिन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून आणले व खऱ्या अर्थाने उपसरपंच निवडीला रंगत आणली आहे.
सरपंच पदी जरी श्री देवी सातेरी, खवणेश्वर गाव विकास पॅनेलचे उमेदवार विजयी झाला असला तरी उपसरपंच पदासाठीसाठी लागणारे सदस्याचे संख्याबळ हे दोन्ही पॅनेलकडे नसल्याने जय हनुमान गाव विकास पॅनेलवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कुडाळ नगरपंचायत निवडणुकीवेळी काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार निवडून येऊन नगराध्यक्षपदी विराजमान होत त्यांनी 'किंगमेकर'ची भूमिका बजावली होती. अगदी त्याचप्रमाणे म्हापण ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवडी वेळी आनंद गावडे यांचे जय हनुमान गाव विकास पॅनेल भूमिका बजावेल, यात काही शंका नाही.