
दोडामार्ग : तालुक्यातील कुंब्रल बागवाडी येथील रहिवासी आनंद नकुळ बांदेकर (वय 55 वर्षे) यांचा माडावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली.
आनंद हे पावसाळा पूर्व नियोजनाच्या दृष्टीने मंगळवारी सकाळी घरासमोरील स्वतःच्या माडाच्या झाडावर नारळ साफसफाई करण्यासाठी आणि चुडते काढण्याच्या उद्देशाने चढले होते. नारळाच्या झाडावर चुडत मारत असताना त्यांचा हात निसटल्याने ते खाली कोसळले. बऱ्याच उंचीवरून कोसळल्यामुळे हात, छाती आणि डोक्याला इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलिसात नोंद झालेली नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ, वहिनी, विवाहित बहिणी असा परिवार आहे.