काळाचा घाला !

Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2023 12:19 PM
views 1101  views

सावंतवाडी : राजवाडा परिसरात भेर्लै माड कोसळलून संभाजी दत्ताराम पंदारे व राहुल प्रकाश पंदारे, रा. आंजिवडे हे दोघे जागीच गतप्राण झाले. अथक प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, अंगावर माड कोसळल्यानं ते जागेवरच ठार झाले. माडासह विजेच्या तारा अंगावर कोसळल्यान त्यांना वाचवणं शक्य झालं नाही. त्यांची वेळच काळ बनून आल्याची खंत उपस्थितांनी व्यक केली.


या घटनेनंतर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पालिकेला माहिती देताच घटनास्थळी सावंतवाडी पालिकेच्या यंत्रणेसह बंब दाखल झाला. उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णावाहीका देखील दाखल झाली होती. मात्र, दोघांपैकी एकाचा मृतदेह हा माडाच्या खाली सापडल्यानं तो बाहेर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर, रवी जाधव यांनी कटरच्या सहाय्यानं माडाचे दोन भाग केल्यान मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. पालिकेचे पांडुरंग नाटेकर, दिपक म्हापसेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, मोहसिन मुल्ला, जोसेफ आल्मेडा, रॉक डान्टस, अर्चित पोकळे, लादू रायका, नंदू गावकर, अखिलेश कोरगावकर आदींसह शहरातील युवकांनी बचावकार्यात सहभाग घेत मृतदेह डॉक्टर व‌ पोलिसांच्या ताब्यात दिला. यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला.


यावेळी पोलिस उपनिरीक्षक अमित गोते, प्रसाद कदम आदी पोलीस घटनास्थळी दाखल होते. डॉ. मुरली चव्हाण यांनी पुढील सोपस्कारासाठी दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान, पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत‌. या घटनेमुळे लाईट गेल्यान शवविच्छेदनगृह अंधारात गेलं आहे. 


दरम्यान, आंजिवडे येथील हे युवक सावंतवाडी येथे भजनासाठी आले होते. भजन आटपून जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला. ओळख पटवण्यासठी आलेल्या नातेवाईकान रूग्णालयातील मृतदेह पाहताच आक्रोश केला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आंजिवडे गावांसह पंदारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.