वझरेत पगारासाठी कर्मचाऱ्याचे शंभर फूट टॉवरवर चडून जीवघेणं आंदोलन

बाबूराव धुरी यांच्या प्रसंगावधनाने टळला मोठा अनर्थ
Edited by:
Published on: April 21, 2024 14:35 PM
views 307  views

दोडामार्ग :  वेदांत कंपनीच्या वझरे येथील सेसा कोक प्लांट मध्ये शनिवारी रात्री एका ठेकेदाराकडे काम करणाऱ्या मजुराने थकलेल्या पगारासाठी चक्क टॉवरवर चडून आंदोलन छेडले. पगार द्या नाहीतर टॉवर वरून उडी मारतो असा आक्रमक पवित्रा घेतल्याने साऱ्यांचीच गाळण उडाली. कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना तुरी देत आनंद गवस या कर्मचाऱ्याने आपल्या पगारासाठी हे टोकाचे पाऊल उचलले. अखेर घटनास्थळी वेळीच धाव घेत शिवसेनेचे उपाजील्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते बाबुराव धुरी, माजी सरपंच लक्ष्मण गवस यांसह ग्रामस्थांनी त्याची समजूत काढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. पोलिसही घटनास्थळी पोहोचले असताना अखेर धुरी यांचीच मध्यस्थी कामी आली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार वाझरे गावचा रहिवासी असलेला आनंद गवस हा वझरे येथील ससा गोवा कंपनीत खाजगी ठेकेदारा अंतर्गत रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. २० एप्रिल उजाडला तरी ज्या ठेकदाराकडे तो कामांस होता त्याने त्याचा पगार अदा केलेला नव्हता. घरी बायको आणि ३ मुले असं कुटुंब.  पगार नसल्याने घरात राशन कसं भरायच या प्रश्नाने तो हैराण झाला. आणि घरात वाद घालून त्याने थेट कंपनी गाठली. आणि तेथील सुरक्षा व्यवस्था भेदत थेट कंपनीत कोल वजन काट्या जवळ असलेला लाईट लॅम्प साठी उभारलेला मोठा टॉवर गाठला. आणि थेट टॉवर वर चडून सर्वांची दाणादाण उडवली. पगार द्या अन्यथा आपण वरून उडी घेऊन, पगार नाही तर संसार चालवू कसा. तीन महिने असच सुरू असल्याचा आक्रमक पवित्रा त्याने घेतला. त्यानंतर ही घटना त्याच्या साऱ्या सहकाऱ्याना, कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना, ग्रामस्थांना कळाली. त्यांनतर साऱ्यांनी त्या टॉवर खाली धाव घेत आनंद ची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कुणाचेच एकेना. अखेर कंपनीकडून पोलिसांना सुद्धा बोलाविण्यात आले. मात्र परिस्थिती जैसे थे होती. 

अखेर बाबुराव धुरीनी हाताळली परिस्थिती...

दादा आपण टॉवर वर चडलोय, हे पगार देत नाही मी काय करू, तुम्ही या नाय तर मी काय आता थांबणार नाही असा थेट फोन रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान आनंद ने धुरी यांना टॉवर वरूनच केला. त्यांनतर घटनेचे गांभीर्य ओळखून धुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी ग्रामस्थ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तो कुणाचे एकत नव्हता.  मात्र आनंद आपल्या भूमिकेवर ठाम होता. अखेर धुरी यांनी कंपनी तुझा पगार देत नसेल तर आपण देतो. पण नको ते पाऊल उचलू नको. खाली उतर तुझ्या सर्व मागण्या मान्य करून घेऊ. आपण जबाबदारी घेतो अशी भूमिका घेत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कंपनी अधिकाऱ्यांनी संबधित ठेकदराची कान उघाडणी केल्याने त्याचा पगारही खाती जमा झाला होता. अखेर बाबूराव धुरी आणि ग्रामस्थांच्या समजुतीने आनंद चे मन वळविण्यात यश आले आणि तब्बल तास दोन तासांच्या कालावधी नंतर सुमारे १०० फूट उंचीच्या टॉवर वरून आनंद एकदाचा खाली उतरला. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थानी, माजी सरपंच लक्ष्मण गवस यांनी कंपनीनं विविध कामांसाठी नेमलेले ठेकेदार मनमानी कारभार करत असतात, कामगारांची पिळवणूक करतात, तीन तीन महिने पगार, व केलेल्या कामांचा मोबदला मिळत नाही. त्या ठेकेदारांना कंपनी पाठीशी घालते असा आरोप केला. याच दरम्यान त्याठिकाणी असलेल्या दुसऱ्या कंपनीची अँब्युलन्स ठेकेदाराच्या मनमानीमुळे आक्रमक पवित्रा घेत तीही बाजूला काढण्यात आली. 

 त्यांनतर घटनेचे गांभीर्य ओळखून धुरी यांनी आनंद गवस याला त्याच्या वझरे येथील घरी नेऊन सोडले. त्याची व कुटुंबीयांची समजूत काढली. लागणारे राशन माझ्याकडुन घेऊन जा पण कधीही असं टोकाचं पाऊल उचलू नका अशी समजूत त्यांनी गवस यांची काढत त्यांना धीर दिला. तर कंपनीनं सुद्धा नियुक्त केलेल्या ठेकदारांच्या मनमानी व मुजोरगिरीवर वेळीच नियंत्रण आणावे अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल याकडे पोलिसांचेही लक्ष वेधले. मात्र धुरी यांच्या प्रसंगवधनाने मोठा अनर्थ टळला एवढ मात्र नक्की. 


*ठेकदाराच्या चुकीमुळे ती घटना; मात्र कर्मचाऱ्यांनी चुकीचं पाऊल उचलू नये, कंपनी कर्मचाऱ्यासोबत...*

      सदर कामगार हा आपल्या कंपनीनं नियुक्त केलेल्या ठेकेदार यांचे अंतर्गत होता. त्याच्या प्रलंबित पगारासाठी त्याने असा टोकाचा निर्णय घेणे उचित नाही. आम्हाला जेंव्हा ही बाब समजली त्याचवेळी संबधित ठेकदार यांना तत्काळ त्याचा पगार देण्यासाठी सूचना केल्या व त्याचे पेमेंट ही अदा करण्यात आले. मात्र यापूर्वी सुद्धा त्या कर्मचाऱ्याने ही बाब कंपनीच्या निदर्शनास आणून दिली असती तर त्यावर तातडीने निर्णय झाला असता. मात्र असं मद्याच्या नशेत जीवघेणं कृत्य करणं, चुकीच्या पद्धतीनं कंपनीत प्रवेश करणे योग्य नाही. कुणावरही अन्याय झाल्यास तो अन्याय दूर करण्यासाठी सनदशीर मार्गाने कंपनीनं नेहमी कर्मचाऱ्यांचे  हित जोपासले आहे. अशी माहितीही या घटनेबाबत बोलताना वझरे सेसा कोक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोकणसाद कडे बोलताना दिली आहे .