
सावंतवाडी : शहरात जेलच्या मागील झुडुपात कुत्र्याची छोटी 6 पिल्ले अज्ञाताने सोडून दिली होती. सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांना याबाबत समजताच त्यांनी तातडीने पिल्लांना जवळच असलेल्या श्री. निर्गुण यांच्या किराणा दुकानाहवळ नेऊन त्यांना दुध पाजून सुस्थितीत आणले. नंतर पिल्लांना नेण्यासाठी सोशल मिडीयावरुन आवाहन केले.
त्यात दोन पिल्लांना एक सद्गहृस्थ घेऊन गेले. त्यानंतर देवदुत डॉ.निधी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या जवळ अगोदरच बरीच कुत्री असल्याने, त्या लहान पिल्लांसाठी पिंजरा आवश्यक असल्याने पिंज-यातून पिल्लांना घेवून येण्यास सांगितले. त्यामुळे मंगेश तळवणेकर यांनी विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नवीन पिंजरा तयार करुन पिल्लांना चराठा येथे डॉ.निधी सावंत यांच्याकडे नेऊन सोडले. गेले चार दिवस त्या कुत्र्यांची देखभाल नेहा निलेश निर्गुण, सोहम राऊळ, वैशाली सावंत करीत होते. त्यांचे व डॉ.निधी सावंत यांचे मंगेश तळवणेकर यांनी आभार मानले व अशा छोट्या पिल्लांना अज्ञात स्थळी सोडू नये, मुक्या जीवांचे हाल करण्याचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे असे मंगेश तळवणेकर म्हणाले.