सर्पदंशाने सागवे गावातील ८ वर्षीय मुलाचा मृत्यू !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 30, 2024 09:30 AM
views 767  views

देवगड : राजापूर तालुक्यातील सागवे हमदारेवाडी येथील राहुल राजू पर्यंकर (८) या बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. त्याला देवगड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. ही घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ बेळगाव खानापूर पिंपरी येथील राजू पर्येकर हे गेले चार वर्षांपासून कामानिमित्त सागवे हमदारेवाडी येथे पत्नी, एक मुलगा व दोन मुली यांच्यासोबत राहत होते. शुक्रवारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या घरी पत्नी आणि मुले होती. शुक्रवारी सुट्टी असल्याने सर्व मुले एकत्रित घराच्या पाठीमागे असलेल्या कलम बागेत खेळत होती. दुपारी जेवण आटोपून पुन्हा खेळण्यास गेली. यावेळी राहुल याच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. मात्र त्याने आपल्या पायाला काटा टोचला आहे, असे आईला सांगितले.

या दरम्यान त्याला चक्कर येऊ लागल्याने तेथीलच कातळी येथील रुग्णालयात नेण्यास आले. त्यांनी उपचारासाठी देवगड येथे पाठविले. मात्र देवगडमध्ये खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे सांगितले.

राहुल हा इयत्ता दुसरी मध्ये शिकत होता. दोन महिन्यांनी २२ जून रोजी त्याचा वाढदिवस होता. तत्पूर्वी त्याच्यावर काळाने घाला घातला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली असून, देवगड ग्रामीण रुग्णालयात रीतसर पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक केसरकर आणि पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.