
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांचा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून गुरुवारी माजी आमदार राजन तेली, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, सौ अर्चनाताई घारे,परशुराम उपरकर आदी पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. हा प्रश्न राज्य पातळीवरील असून सर्वपक्षीय एकत्र येऊन हा प्रश्न सोडवू अशी ग्वाही या उपोषणकर्त्यांना दिली. तर शासकीय नियम, निकषाप्रमाणे आवश्यक त्या सर्व परीक्षा व प्रक्रिया पूर्ण करून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नवीन शिक्षण सेवकांना रोखून धरू असा इशाराही दिल्याने पुन्हा हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, राजन तेली यांनीही गुरुवारी उपशनस्थळी भेट देत, मंगळवारी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत डीएड बेरोजगार संघर्ष समितीची बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगाराना न्याय कसा मिळेल व तो न्यायिक पातळीवर कसा टिकेल असा प्रयत्न करू अशी ग्वाही दिली आहे. शिक्षण मंत्री जिल्ह्यातील आहेत मात्र ते स्थानिक डीएड बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरले आहेत. म्हणूनच राज्य पातळीवर हा प्रश्न आपण सोडवू अशी ग्वाही राजन तेली यांनी यावेळी उपोषणकर्त्यांना दिली.
जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण सेवक नियुक्तीची प्रक्रिया एका बाजूने सुरू झाली आहे. हे सर्व उमेदवार शिक्षण सेवक नियुक्तीसाठी पात्र ठरणाऱ्या सर्व परीक्षा देऊन गुणवत्ता यादीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवड यादीत आले आहेत. त्यांच्या भरतीची प्रक्रिया व कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. या पात्र उमेदवारांना रोखण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य व पाठबळ देण्याचे आश्वासन दिले आहे. जोपर्यंत स्थानिकांना न्याय मिळत नाही व जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांना शिक्षण सेवक पदावर घेण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा संघर्ष समितीचे नेते विजय फाले यांनी दिला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रयत्न असफल
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन थांबावे यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी आंदोलन स्थळी जाऊन डीएड पदविकाधारक बेरोजगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र याला यश मिळू शकले नाही. उलट यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित सामंत यांनी या उमेदवारांना न्याय देणे हे आपल्या हातात नसेल तर आपण इथून जा अशा शब्दात दरडावले.तर आंदोलकही आपल्या मतावर ठाम राहिले. या मुळे शिक्षण अधिकाऱ्यांचे प्रयत्न व यशस्वी ठरले.