
सावंतवाडी : खनिकर्म विभागाच्या निधीतून आणलेल्या रूग्णवाहिका सडून जाण्याची परिस्थिती सावंतवाडी शहरात पहायला मिळत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेकडील रूग्णवाहीका गेली दोन वर्षे जाग्यावरची हलली नसून रूग्णांना त्याचा फायदा होत नाही असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी केला आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र आबोंलीतून शहरात आलेली रूग्णवाहिका रूग्णसेवेत वापरत नसल्याची काहींची तक्रार होती. दरम्यान, ही रूग्णावाहिका रूग्णसेवेत असून सावंतवाडी शहरात औषध घेण्यासाठी आल्याची माहिती रूग्णवाहीकेवरील मेडिकल ऑफिसर यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या या रूग्णवाहिका असून बऱ्याच रूग्णवाहिकांवर चालक नसल्याने त्या कुचकामी ठरत आहेत.
सावंतवाडी शहरात आलेली आंबोली प्राथमिक केंद्रांची रूग्णवाहिका रूग्णसेवा देत नसल्याची तक्रार काहींनी केली होती. याबाबत शहरात उभ्या असलेल्या रूग्णवाहिकेतील मेडीकल ऑफिसर यांना विचारलं असता माडखोल केंद्रावर ही रूग्णावाहिका आली होती. शहरात औषधे घेण्यासाठी आपण आलो होतो. ही रूग्णवाहिका रूग्णसेवेत आहे. तिचा वापर प्रशासकीय काम व रूग्णसेवेसाठीच होत असल्याची माहिती मेडिकल ऑफिसरकडून देण्यात आली.
दरम्यान, या ठिकाणी आलेले माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी रूग्णवाहिकांचा वापर रूग्णसेवेसाठी होण आवश्यक आहे. असं असताना सावंतवाडी नगरपरिषदेकडील रूग्णवाहीका गेली दोन वर्षे जाग्यावरची हललेली नाही. रूग्णांना त्याचा फायदा होत नाही असा आरोप माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी केला आहे. या रुग्णवाहिका वापरात नसल्यानं सडून जाण्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी यांनी तातडीने यात लक्ष घालून गोरगरीब रूग्णांना या रूग्णवाहिकेचा लाभ करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात जिल्ह्यांच्या खनिकर्म विभागाच्या निधीतून माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी या रुग्णवाहिका घेतल्या होत्या. जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रूग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. परंतू, बहुतांश रूग्णवाहिकांवर चालक नसल्याने त्या जाग्यावरच आहे अशी परिस्थिती आहे. रूग्णांना त्याचा लाभ होत नाही. सावंतवाडी नगरपरिषदेकडील शहरासाठी दिलेली रूग्णवाहिका तर दोन वर्षे धूळ खात असून सडण्याच्या मार्गावर आहे. याबाबत नाराजी व्यक्त केली जात असून रूग्णसेवेसाठी घेतलेल्या या रूग्णवाहिका सरकारने वापरात आणाव्यात अशी मागणी आता होत आहे.