
सावंतवाडी : आंबोली मार्गे गोव्यात जाणाऱ्या दरोडेखोरांना आंबोली घाटात गाठत आंबोली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पलायन केलेल्या या तिघा संशयितांना शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन शस्त्र व काडतूसे जप्त करण्यात आलीत. दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने आंबोली पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुणे हिंजवडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून गोव्याच्या दिशेने पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली येथील पोलिस दुरक्षेत्रावर शनिवारी सायंकाळी पकडण्यात आले. पोलिसांनी अचानक कार थांबल्यानंतर दरोडेखोरांकडून कार पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी स्वःताच्या जीवावर उदार होत या दरोडेखोरांना जागेवर पकडले. यात अल्ताफ बाबू खान (24), गोविंद भवरालाल दिवाणी (23), रातुराम कृष्णराम बिष्णोई (26) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलिस हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई, पोलीस नाईक मनीष शिंदे, पोलीस हवालदार दीपक शिंदे, आबा पिळणकर, अभिजीत कांबळे, पोलिस कॉन्स्टेबल राजेश नाईक यांच सर्वत्र कौतुक होत आहे.
या घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी सावंतवाडीत दाखल झाले होते. रविवारी संशयितांना सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.अधिक तपास सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.