आंबोली आमची, भांडी नकोत तुमची !

भांडवलदारांचा जमीनींवर डोळा !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 07, 2024 10:51 AM
views 954  views

सावंतवाडी : आंबोली गावठणवाडी येथील हिरण्यकेशी ते राघवेश्वर रोड दरम्यानच्या परिसरात ग्रामस्थांच्या वहीवाटी,  कबुलायतदार गावकर व सद्य महाराष्ट्र शासन जमिनीवर परप्रांतीयांकडून होत असलेल्या अनधिकृत बांधकामा विरूद्ध स्थानिक ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्राची चेरापुंजी 'आंबोली'च्या निसर्ग सौंदर्यासह येथील धार्मिक स्थळांचं पावित्र्य धोक्यात आल्याची भावना त्यांची आहे. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनात्मक मार्गाच्या पवित्र्यात असून ''आंबोली आमची, भांडी नकोत तुमची !'' असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे.


याबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गावच्या प्रथम नागरिक यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे. ते म्हणतायत, गावमौजे आंबोली येथील “कबुलायतदार गावकर जमीन" पुर्वीपासून परंपरागत वहीवाटीने कसत व सामाईकरित्या मुक्तपणे उपभोगत आलेले आहोत. या जमीनीत उपजिवीकेसाठी पारंपारिक शेती करत आलेले आहोत. दुभती व इतर जनावरे याच जमीनीत चरतात तसेच शेतीसाठी व घरात इंधनासाठी लागणारे जळावू आणि गुरांचे वाडे, घरे शाकारण्याकरीता लागणारे लाकुड याच जमीनीतील जंगलातून पारंपारिकरित्या पर्यावरणाचा समतोल राखून मिळवतो अशी स्थानिकांची भावना आहे. आज याच जमिनींवर प्ररप्रांतियांकडून अतिक्रमण होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


जमीनीवर भांडवलदारांचा डोळा !

कबुलायतदार गावंकर जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ठ व प्रलंबीत असतानाही या जमीनीवर अनाधिकृत अतिक्रमणे करत काही बांधकामे पुर्णत्वास आणली आहेत व काही सध्या चालु आहेत. पुर्वीपासून कसत असणा-या मुळ रहिवासी शेतक-यांना योग्य त्या समप्रमाणात जमिनी वाटप करण्याचे निर्देश महसुल विभागाने शासन निर्णयानुसार हल्लीच दिलेले आहेत. याबाबतची कार्यवाही शासन स्तरावर चालु आहे. असे असताना आंबोली हे थंड हवेचे पर्यटन स्थळ व निसर्गसंपन्न असल्यामुळे येथील जमीनीवर भांडवलशाही लोकांचा डोळा आहे. त्यामुळेच परगावचे भांडवलशाही लोक काही ठरावीक लालची तसेच अशिक्षीत ग्रामस्थांना व शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृतपणे मोठ्याप्रमाणात जमीनींची खरेदी-विक्री व्यवहार राजरोसपणे करीत आहेत. त्यात बरीच मोठी अनाधिकृत आर्थिक उलाढालही होत आहे. या अनधिकृतपणे अतीक्रमणामुळे मोठ्याप्रमाणात जंगलतोड होत आहे. त्यामुळे येथील मुळ ग्रामस्थांना दैनंदिन उपजिवीकेसाठी व राहण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नाही. शिवाय या भांडवलशाही लोकांकडून मुळ रहिवासी ग्रामस्थांना त्याचेच पारंपारिक वहीवाट व कसवटीच्या जागेत अडविले जात आहे. त्यांना धमकी स्वपरुपातील उत्तरे दिली जात आहेत. भविष्यात कदाचित मारहाण अथवा कोणताही अन्य त्रास होण्याची दाट शक्यताही नाकारता येत नाही अशी भिती ग्रामस्थांत आहे.

धार्मिक पावित्र्य धोक्यात !

श्री हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, श्री गणेश मंदीर राघवेश्वर ही पवित्र स्थाने या भागात असून येथील सर्व ग्रामस्थांची श्रद्धास्थाने आहेत. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना त्यात गुंतलेल्या आहेत. या भागातील जमीनीवर अनाधिकृत अतिक्रमणांमुळे व त्या बांधकामांचा भविष्यात मद्यपानासाठी वापर झाल्यास  त्या वापरामुळे या तीर्थक्षेत्रांच्या परिसराचे पावित्र्य धोक्यात येणारे आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या श्रद्धेला ठेच पोहोचणारी आहे. यामुळे दारु विक्री व बार करीता परवाने मिळण्यास नाहरकत वा तत्सम दाखले ग्रामपंचायतीकडुन देण्यात येऊ नयेत अशी मागणी केली आहे. तर जमीन विक्री करणारे व जमिन खरेदी करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई होवून त्यांना शिक्षा देणं अत्यावश्यक आहे. त्या व्यतिरिक्त झालेली अतिक्रमणे त्वरीत काढुन टाकून जमीन मोकळी करुन ग्रामस्थांना परत त्याचे पारंपारिक वहीवाट व कसवटीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी आहे. परंतू, शासकीय कार्यालयांकडून, अधिका-यांकडुन तसेच ग्रामपंचायतीकडून संबंधित बाबींकडे दुर्लक्ष केल जात आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही अतिक्रमणे त्वरीत काढून टाकून जमीन मोकळी करुन ग्रामस्थांना परत उपलब्ध करुन न दिल्यास कायदेशीर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा ही त्यांनी दिला आहे.


"याप्रकरणी स्थानिकांनी निवेदन दिले आहे. त्यावर आम्ही आंबोली ग्रामपंचायतीला  प्रांत अधिकारी सावंतवाडी महोदय यांनी ग्राम पंचायत आंबोली यांना अतिक्रमण करून सुरू असलेल्या बांधकामाला कोणत्याही पद्धतीचा घर नंबर देऊ नये असे कळवले आहे. स्थानिकांनी या भागात आपली वहीवाट असलेल्याचे सांगितले आहे. जे काही होईल ते कायद्याच्या पलीकडे होणार नाही."

- श्रीधर पाटील, तहसीलदार, सावंतवाडी


एकंदरीत, आंबोलीतील महाराष्ट्र शासन लागू असलेल्या जमिनी ज्या लोकांच्या वहीवाटीखाली आहेत त्यातील काहींनी शासन निर्णय होऊन जमीन वाटपापूर्वीच त्या जमीनी बाहेरच्या लोकांना विकण्यास सुरुवात केली आहे. पैशाच्या हव्यासापोटी अशा प्रकारे आंबोलीमध्ये शेकडो एकर जमिनी या अगोदर विकल्या गेल्या आहेत. तर काहींची फसवणूक करून त्या जमीनी लुबाडल्या गेल्या आहेत. शासन निर्णय होताच आंबोलीवर डोळा असलेल्या भांडवलदारांची पावलं आता आंबोलीकडे वळत आहेत. त्यामुळे कबुलायतदार प्रश्न सोडवण्याच श्रेय घेणारे, हार-तुरे, सत्कारासह साखर वाटप करणारे शालेय शिक्षणमंत्री मंत्री दीपक केसरकर व सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार राजन तेली या अतिक्रमणावर कोणती भुमिका घेतात ? याकडे त्रस्त झालेल्या आंबोलीवासियांच लक्ष लागलं आहे.