राजे प्रतिष्ठानच्यावतीने आंबोली शिवजन्मोत्सव !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 30, 2024 06:13 AM
views 48  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-कामतवाडी येथे राजे प्रतिष्ठानच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.  यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे, सरपंच सावित्री पालेकर, गावकर श्रीकांत गावडे, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे, बबन गावडे, जगन्नाथ गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, हेमंत ओगले, बाळकृष्ण तेंडुलकर, शांताराम गावडे, अर्जुन गावडे, हायस्कूलचे प्राचार्य विठ्ठल मोरे, शिवा गावडे, शंकर चव्हाण, मायकल डिसोजा, शांताराम पाटील, डी. पी. सावंत, देवसू गावचे सरपंच रुपेश सावंत, वैभव राऊळ, सुशील तावडे, तानाजी गावडे यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास गावडे यांना व राजे प्रतिष्ठानसाठी झटणाऱ्या मावळ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच डी. पी. सावंत, संदीप गावडे, रुपेश पाटील यांनाही राजे प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज हे अजब रसायन आहेत. आजच्या काळात शिवरायांचे विचार युवा पिढीला नक्कीच सर्व संकटांवर उपाय म्हणून फलदायी ठरू शकतात. एवढी ताकद शिवचरित्राच्या अभ्यासातून नक्की मिळते. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनात कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही. महाराजांनी सर्वाधिक युद्धे  अमावस्येच्या दिवशी केलेले आहेत. मुहूर्त पाहून महाराज कधीही लढले नाहीत. म्हणून आजकाल मुहूर्त शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा शिवरायांच्या विचारांना आचरणात आणले तर नक्कीच आपल्याला त्याचे चांगले व सकारात्मक परिणाम पाहावयास मिळतील असे विचार सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आंबोली येथे व्यक्त केले. जगातील सर्वोत्तम दोन छत्रपती घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे विचार देखील आजच्या माता - भगिनींनी अभ्यासले पाहिजेत. जेणेकरून बालकांना आपल्याला शिव संस्कारातून घडविता येईल. अलीकडे मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आणि सोशल मीडियाचा अतिवापरामुळे युवा पिढी भरकटत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवचरित्राचे पारायण करणे गरजेचे वाटते, असे सांगत प्रा. रुपेश पाटील यांनी स्वराज्य निर्मितीसाठी लढलेल्या मावळ्यांची निष्ठा व शिवरायांची प्रजादक्षता याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.


दरम्यान, यानिमित्त राजे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित चित्र शिवकालीन चित्र प्रदर्शनास शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम देखील घेण्यात आले. सायंकाळी राम मंदिरपर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक प्रसाद गावडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी फोनवरून उपस्थितांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.