
सावंतवाडी : महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या आंबोलीच्या निसर्ग भ्रमंतीसाठी खास जीपची सोय करण्यात आली आहे. सावंतवाडी येथील 'नरेंद्र' सफरला मिळालेल्या प्रतिसादानंतर आंबोलीसाठी या गाड्या घेण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते याच लोकार्पण करण्यात आले. वनविभाग सावंतवाडी व वनपरिक्षेत्र आंबोलीच्या माध्यमातून ही सफर घडवली जाणार आहे. नांगरतास धबधबा, कावळेसाद पॉईंट, महादेव गड, हिरण्यकेशी उगम, आंबोली वनउद्यान आदी पर्यटन स्थळांच दर्शन घडवलं जाणार आहे. प्रति व्यक्ती व स्वतंत्र सफारीकरिता शुल्क आकारले जाणार आहेत. वन तपासणी नाका, आंबोली येथून सकाळी ९ ते दुपारी १ वा. / दुपारी २ ते सायं. ५ वा. ही सफर घडवली जाणार आहे.
दुर्मिळ सरीसृप व उभयचर प्रजातींचा निसर्गानुभव यामुळे करता येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उपवनसंरक्षक सावंतवाडी एस.नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड, वनपरीक्षेत्र अधिकारी आंबोली श्रीमती विद्या कांबळे, वनपरीक्षेत्र अधिकारी सावंतवाडी मदन क्षीरसागर, पारपोली सरपंच कृष्णा नाईक आदी उपस्थित होते.