शाळेत दारू पिऊन हुल्लडबाजी ; संदीप गावडेंनी नशा उतरवली

Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2024 14:34 PM
views 277  views

सावंतावडी : आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या हुल्लडबाज लोकांकडून विद्येचे मंदीर असणाऱ्या शाळेत मद्यपानास बसल्याची घटना घडली. भाजप माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. देवस्थान, मंदीर परिसरात असे प्रकार घडता नये याची काळजी पोलिसांकडून घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा जनतेला यात लक्ष घालावे लागेल असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे‌.

आंबोली गावठणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे येथील शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेले असता पालकांनी संबंधितांचा व्हिडिओ दाखवत आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली. यानंतर पोलिस निरिक्षकांच संदीप गावडे यांनी लक्ष वेधल‌. 

श्री गावडे म्हणाले, अशा लोकांना पर्यटक म्हणणार नाही. केवळ मद्य पिऊन मजा करायला येणारी ही लोक आहेत. शाळेत केलेला हा प्रकार निंदनीय आहे. शाळेत वह्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी गेलो असता तिथल्या पालकांनी ही व्यथा मांडली. मन हेलावून टाकणारा हा प्रकार आहे. पर्यटनाच्या नावाखाली होणारा त्रास कमी झाला पाहिजे. शाळा, देवस्थान असतील अशा ठिकाणी असे प्रकार घडता नयेत. बाहेरून येणारे पर्यटक या ठिकाणी हुल्लडबाजी करतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. याबाबत पोलिसांनी माहिती देऊन त्याप्रकारचं निवेदन दिले आहे. आंबोली, चौकुळ भागात ज्या ठिकाणी असे प्रकार होतात त्याबद्दल पोलिसांना कल्पना दिली आहे. ताबडतोब कारवाईची मागणी केली आहे. विशेषतः शनिवारी, रविवारी असे प्रकार घडतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. पोलिसांनी याबाबत दक्षता घेणार असल्याचे सांगितले. 

यापुढे असे प्रकार दिसल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तशी कारवाई न झाल्यास एक नागरिक म्हणून प्रतिकार आम्ही करू, स्थानिकांच्या बाजून आम्ही राहू. या अशाच गोष्टींमुळे मारहाणीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे पोलिसांनी योग्य उपाययोजना करावी, अशा लोकांवर कारवाई न केल्यास जनता म्हणून आम्हाला त्यात लक्ष घालावं लागेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी आंबोली प्रमुख गांवकर तानाजी गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे आदी उपस्थित होते.