
सावंतवाडी : कोकण आणि कोकणचा निसर्ग याच्या प्रेमात मराठीसह बॉलीवूड, हॉलीवूडही प्रेमात आहेत. निसर्गाच्या कुशीत एखादा सीन करण्यासाठी कोकणी जीवनमान दाखवण्यासाठी कोकणाची निवड केली जाते. मात्र, सध्या चित्रपटसृष्टी कोकणच्या अधिकच प्रेमात आहे. 'मुंजा' नंतर 'अल्याड पल्याड !' मधून कोकणचे दर्शन होणार आहे. शुक्रवारी १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून थिएटरमध्ये पहायला मिळणार आहे.
या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक स्थळे निवडली आहेत. 'अल्याड पल्याड' या चित्रपटाचे संपूर्ण शुटिंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आले आहे. मालवण, देवगड, ओरोस या तीन ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. येत्या शुक्रवारी १४ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास शंभरहून अधिक जणांना या चित्रपटाच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळाली आहे. चित्रपटाचे प्रोड्युसर मॅनेजर म्हणून रात्रीस खेळ चाले मालिकेतील कलाकार प्रा.प्रतिभा चव्हाण यांनी काम पाहिले आहे.
मसुरे, कांदळगाव, देवगड, वाडा या गावातील नागरिकांचा यात समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्थळे व कलाकार यांचा सहभाग असलेल्या 'अल्याड पल्याड' मधून कोकणचे दर्शन होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन व महेश निंबाळकर यांनी केली आहे. दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांचे आहे. तर प्रमुख भुमिकेत अभिनेते मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीकर, भाग्यम जैन, अनुष्का पिपुटकर आदी कलाकार आहेत. चित्रपटात एका गाण्याचे पुणे येथे चित्रीकरण करण्यात आले आहे. उर्वरित चित्रीकरण मालवण, देवगड तालुक्यात झाले आहे. चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी तर संकलन सौमित्र धरसुलकर, कलादिग्दर्शक योगेश इंगळे, कथा प्रीतम एस. के. पाटील, पटकथा संवाद संजय नावगिरे, वेशभूषा गांधी, ध्वनी स्वरुप जोशी, कार्यकारी निर्माते संतोष खरात, लाईन प्रोड्युसर दीपक कुदळे पाटील, रंगभूषा अभिषेक पवार, पार्श्वसंगीत अभिनय जगताप, स्वानंद देव, विष्णु घोरपडे, प्रोड्युसर मॅनेजर म्हणून प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी काम पाहिले आहे. कोकणातील दंतकथेवर आधारित 'मुंजा'ला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता कोकण दर्शन घडवणाऱ्या 'अल्याड पल्याड' चीही उत्सुकता प्रेक्षकांत पहायला मिळते.