मालवणातील 'त्या' २५ शाळांमध्ये शिक्षकांची पर्यायी व्यवस्था | कोणतीही शाळा शिक्षकाविना बंद राहणार नाही

विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात होणार स्वागत
Edited by:
Published on: June 14, 2023 18:37 PM
views 195  views

मालवण : मे महिन्याच्या सुट्टीनंतर उद्यापासून शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट सुरु होणार आहे. मालवण तालुक्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्याने 25 शाळा शून्य शिक्षकी दिसत होत्या. मात्र, त्याठिकाणी आता शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यातील कोणतीही शाळा शिक्षकाविना बंद राहणार नाही. विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी दिली. 

आंतरजिल्हा व नियमित बदली प्रक्रियेतून मालवण तालुक्यातील  शिक्षकांच्या बदल्या झाल्याने 25 शाळा शून्य शिक्षकी दिसत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. पासून पासून शाळा सुरु होत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच 25 शाळांमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती होती. विद्यार्थी, पालक यांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. अखेर शिक्षण विभागाने 'त्या ' 25 शाळा शिक्षकाविना बंद राहणार नाही याबाबत नियोजन केले आहे. शून्य शिक्षकी शाळांमध्ये पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे सर्व शिक्षक त्या त्या शाळेमध्ये हजर झाले आहेत. उद्या शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील एकही शाळा शिक्षकाविना बंद राहणार नाही. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत असे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी सांगितले.