
सावंतवाडी : महिला दिनाचे औचित्य साधत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि मुख्याध्यापक धाकोरे यांचे संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात धाकोरे येथील नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच धाकोरा गावच्या जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी प्रियांका रश्मी रवींद्र गोवेकर ही धाकोरे गावातील प्रथम महिला डॉक्टर झाल्याबद्दल तसेच तिने बीएएमएस पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करून तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष नितीन मुळीक, माजी पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य पूजा कोठावळे, भारती मुळीक, अपर्णा प्रभुराळकर, मुख्य गटप्रवर्तक अपर्णा राळकर तसेच माता पालक संघाचे अध्यक्ष सौ. मुळीक, बाबुराव गोवेकर, रश्मी गोवेकर, अंगणवाडी सेविका मनाली साटेलकर, माजी अंगणवाडी सेविका प्रेमा राणे, मुख्याध्यापक दिलीप जाधव, शिक्षिका सौ. कांबळी तसेच आजगाव व धाकोरा ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी माता पालक संघ, शिक्षक पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याधापक यांच्या वतीने उपाध्यक्ष नितीन मुळीक यांच्याहस्ते डॉ. प्रियांका गोवेकर यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नितीन मुळीक यांनी प्रियांकाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करीत जिल्हा परिषद शाळा ही ग्रामीण भागातील संस्कारांची व विकासात फार महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले.
डॉ. प्रियांका गोवेकर यांनी आपण जिल्हा परिषद शाळेतच शिकलो, जिल्हा परिषदेच्या शाळेने माझ्यावर चांगले संस्कार व शिस्त बिनवली. आज येथील शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळेच आपण डॉक्टर होऊ शकलो. आपल्या यशाचे सारे श्रेय कुटुंबाबरोबरच शिक्षक व मित्रमंडळीला त्यांनी दिले.
माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर यांनी उपस्थित सर्व महिला वर्गाला शुभेच्छा देत सर्वांनी धाकोरा गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, एकजुटीने काम केल्यास यशाला गवसणी घालता येते, असे सांगत प्रियांकासारखे यश इतर मुलींनीही मिळवावे. आज डॉक्टर होण्याचा सन्मान प्रियांकास जरी मिळाला तरी गावाचे नाव मोठे झाले. तिचा आदर्श घेऊन इतर मुलींनीही आपापल्या क्षेत्रात चांगले काम करून नावलौकिक कमवावा व गावाचे नाव रोशन करावे. धाकोरा गावासाठी आपल्याकडून नेहमीच सहकार्य राहिले आहे, असेच सहकार्य डॉ. प्रियांका गोवेकर या सुद्धा करतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी सरपंच स्नेहा मुळीक यांनीही मनोगत व्यक्त करत गावाच्या विकासासाठी तत्पर असल्याचे नमूद केले. अपर्णा अच्युत प्रभुराळकर यांनी महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले भवितव्य घडवावे, असे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी महिलांनी कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता नेहमी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असा संदेश दिला व डॉ. प्रियांका यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत सौ. कांबळी यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जाधव यांनी केले. दरम्यान महिलांच्या व विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी पार पडला.