
सिंधुदुर्गनगरी : गेली दहा वर्षे आमदार आहे. यातील आठ वर्षे विरोधी पक्षात राहिलो. केवळ दोन वर्षे सत्तेची मिळाली. त्यात मी लक्षवेधी विकासकामे केली आहेत. त्यामुळे मला फक्त भविष्यात सत्तेची पाच वर्षे मिळाली पाहिजेत. या काळात सी वर्ल्ड, चीपी विमानतळ, सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत यांसह रोजगार निर्मितीचे जिल्ह्यातील प्रश्न सोडविले जातील, असा विश्वास कणकवली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित "व्हिजन मतदारसंघ विकासाचे" कार्यक्रमात बोलताना केले.
कणकवली येथील आ राणे यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने पुष्पगुच्छ देवून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राणे यांनी, निवडणुकीत केवळ राजकीय भाष्य आवश्यक नाही. तर जनतेला कोणता विकास देणार आहोत ? कोणते प्रकल्प आणले जाणार आहोत ? यावर डेबिट होणे गरजेचे आहे. स्पर्धा करणारी संकल्पना व्यक्त होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यालय पत्रकार संघाने व्हिजन मतदारसंघ विकासाचे हा सुरू केला प्रश्नोत्तराचा उपक्रम अत्यंत चांगला आहे. यामुळे भविष्यात निवडून येणाऱ्या उमेदवारांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल, असे सांगत कौतुक केले.
सी वर्ल्ड प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाचा मानबिंदू आहे. यावर जिल्ह्याचे विकासाचे भवितव्य अवलंबून आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गच्या नावलौकिक भर पडणार आहे. त्यामुळे तो आपल्या जिल्ह्यातच व्हावा, असे मला वाटते. तसेच खा नारायण राणे यांचा चीपी विमानतळ आंतरराष्ट्रीय व्हावा, असा प्रयत्न होता. परंतु मधल्या काळात सत्ता बदलल्या नंतर ही संधी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री कै मनोहर पर्रीकर यांनी आपल्या राज्यासाठी साधली. त्यामुळे आपल्याकडे केवळ डोमेस्टिक विमानतळ सुरू झाले. खा राणे यांना येथे केवळ विमानतळ करायचे नव्हते तर तेथे विमान सबंधित कॉलेजेस, कंपन्या आणण्याच्या होत्या. पायलट ट्रेनिंग सुरू करायचे होते. परंतु डोमेस्टिक मान्यता मिळाल्याने यातील काहीच होवू शकलेले नाही. परंतु येणाऱ्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास हे प्रश्न आपण निश्चित पणे सोडविणार आहोत, असे सांगितले.