
चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा चिपळुणात शनिवारी २१ रोजी येत असून शहरात उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने अजित पवार शहरातील विविध ठिकाणी भेटी देणार आहेत. शिवाय विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांशी तसेच नागरिकांशी संवाद साधणार आहे.यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोर २१ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
जनसन्मान यात्रेची माहिती देताना आमदार निकम म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार चिपळुणात येत आहेत. शनिवारी २१ रोजी दुपारी ३ वाजता सावर्डे येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर चिपळुणातील बहादूरशेखनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून नगर पालिकेपर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर जाहीर सभेला सुरवात होईल. सभा संपल्यानंतर कापसाळ येथील माटे सभागृहात उपमुख्यमंत्री ना. पवार विविध संघटना, महायुतीचे पदाधिकारी, तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. तत्पूर्वी ना. पवार हे माजी आमदार स्व. निशिकांत तथा नाना जोशी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन दैनिक सागरच्या संपादक श्रीमती शुभदा निशिकांत जोशी व सुपुत्र, उद्योजक राजू जोशी यांची विचारपूस करणार आहेत. तसेच शहरातील मुस्लीम समाजाच्या सभागृहास भेट देऊन तेथील पाहणी करणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने येथील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे.
ना. अजित पवार यांच्या पुढाकाराने तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून चिपळूण शहराची ग्रॅव्हिटी पाणी योजनेस मान्यता मिळाली. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. यापुढील कालावधीत शहरात भुयारी गटार योजना, भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे, शहर व परिसरातील पूरनियंत्रण आराखडा, महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी शासनाकडून मोठ्या निधीची गरज आहे. या प्रकल्पाबाबतही ना. पवार यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे आमदार निकम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, सौ. आदिती देशपांडे, सूर्यकांत खेतले, सौ. दिशा दाभोळकर, जयंत शिंदे, डॉ. राकेश चाळके, निलेश कदम, मनोज जाधव,सचिन पाटेकर,पांडुरंग माळी, उदय चिखले, उदय ओतारी, सचिन साडविलकर, मीनल काणेकर आदी उपस्थित होते.