दिल्लीत हवेच्या प्रदूषणाने गाठली अतिघातक पातळी..!

Edited by:
Published on: November 14, 2023 13:15 PM
views 159  views

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या फटक्यांच्या आतषबाजीमुळे दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाने अतिघातक पातळी गाठली. सोमवारी राजधानीतील प्रदूषणाचे प्रमाण सरासरी ४५० पर्यंत पोहोचले होते. काही भागांमध्ये प्रदूषणाने ९०० ची पातळी गाठली होती. प्रदूषणाच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी आम आदमी पक्ष व भाजपमध्ये द्वेषारोषाचे फटाके फोडले जात आहेत.

गेल्या आठवडय़ामध्ये शुक्रवार दिल्लीत झालेल्या पावसामुळे प्रदूषणाचे प्रमाण झपाटय़ाने कमी झाले होते. हवेतील प्रदूषण तातडीने नियंत्रणात आणण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावरही बंदी घातली होती. मात्र, लक्ष्मीपूजनानंतर रविवारी संध्याकाळपासून दिल्लीकरांनी प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून फटाके फोडण्याचा आनंद लुटला. त्यामुळे दिवाळीच्या काळात होणाऱ्या प्रदूषणाचा गेल्या आठ वर्षांतील उच्चांक यंदा नोंदवला गेला.

सोमवारी सकाळी ६ वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियम, लाजपत नगर आदी भागांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण (एक्यूआय) ९०० हून अधिक होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार सोमवारी दुपारनंतर प्रदूषणाचे प्रमाण झपाटय़ाने कमी झाले. दुपारी १२ वाजता सरासरी प्रमाण ३२२ होते. २०१६ मध्ये हवेतील प्रदूषणाचा स्तर (एक्यूआय) ४३१, २०१७ मध्ये ३१९, २०१८ मध्ये २८१, २०१९ मध्ये ३३७, २०२० मध्ये ४१४, २०२१ मध्ये ३८२, तर २०२२ मध्येही ३०० हून अधिक नोंदवला गेला होता.फटाक्यांमुळे प्रदूषणामध्ये झालेल्या प्रचंड वाढीचे खापर दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी उत्तर प्रदेश व हरियाणा या दिल्लीशेजारील राज्यांवर फोडले.