
सावंतवाडी : प्रवासी वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नसलेल्या सातुळी आणि बावळाट गावात नियमित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याकडे अनेकवेळा लक्ष वेधुनही दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सावंतवाडी एसटी आगार गाठून एस टी आगार प्रमुख निलेश गावित यांना जाब विचारला.
यावेळी या दोन्ही ग्रुप गावच्या सरपंच सोनाली परब यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत या महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आगार प्रमुख निलेश गावित यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत त्यांना अक्षरशः धारेवर धरले. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी गावात नियमित वेळेत आणि सुट्टीच्या दिवशी बससेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास या दोन्ही गावच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दाणोली बाजारपेठेत एसटी रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला.
अखेर आगार प्रमुख निलेश गावित यांनी सकाळी ९:१५ वाजता सुटणारी बस वेळेत सोडण्यासह शालेय सुट्टीच्या दिवशीही या बससह दुपारची बस नियमित सोडण्याचे ग्वाही दिल्यानंतर तणाव निवडला आणि ग्रामस्थ शांत झाले. तसेच सायंकाळच्या सत्रात एक बस सुरू करण्याबाबत करण्याचे आश्वासन दिले.