लोकसभेनंतर गद्दारांना गाडू, सुरुवात कोकणातून ! | ठाकरे गटाचा इशारा

Edited by: विनायक गावस
Published on: February 02, 2024 11:57 AM
views 282  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झंझावात कोकणात येत आहे. याची सुरूवात रायगडपासून सुरू झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात  पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे आहे. आधी लोकसभेची लढाई जिंकू आणि नंतर त्या चाळीस गद्दारांना गाडू असा इशारा शिवसेना सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.

महाराष्ट्रातील जनता निवडणुकांची वाट पाहत आहे. आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची झालेली गद्दारी पाहता  लोकच गद्दारांना धडा शिकवणार आहे असं मत अरूण दुधवडकर यांनी व्यक्त केल. यावेळी सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब, युवा सेना जिल्हा समन्वयक गीतेश राऊत, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, हिमांशू परब आदी उपस्थित होते.

4 फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सर्वप्रथम त्यांचे आगमन सावंतवाडीमध्ये होणार असून सावंतवाडी येथे गांधी चौकामध्ये ते सकाळी अकरा वाजता जनतेशी संवाद साधतील यानंतर ते कुडाळ आणि दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांनी सावंतवाडी तालुक्याच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. 

लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उभारी घेईल. ज्यांनी मानसन्मान, पदे दिली त्यांच्याशी गद्दारी केलेल्यांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवणार आहे. या गद्दारांचे पतन तर होणारच आहे मतपेटीतून जनता या शिवसेना पक्षातून गेलेल्या 13 गद्दारांना धडा शिकवणार आहे. लोकसभा निवडणूक ही गद्दारांची पतन करणारी निवडणूक असणार आहे आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 40 गद्दारांना जनता मतपेटीतून गाडून टाकेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जनतेची सर्व सहानुभूती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. ज्या पद्धतीने यांनी पक्षाशी बेईमानी केली पक्षप्रमुखांची गद्दारी केली त्यांचा हिशोब या निवडणुकीत चुकता केल्याशिवाय जनता राहणार नाही असे ते यावेळी म्हणाले.

दरम्यान सावंतवाडी तालुक्यांमध्ये सर्वप्रथम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आगमन होणार असून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रमुखांच्या  दौऱ्याने उत्साह संचारून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसैनिक पेटून उठून काम करतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मुंबईतील चाकरमानी आणि शिवसैनिक ही मोठ्या संख्येने या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत.