दोडामार्ग : कुडासे धनगरवाडी येथे तिलारी प्रकल्पाच्या फुटलेल्या डाव्या कालव्याची डागडुजी करून तब्बल अकरा दिवसांनंतर पाणी प्रवाह सुरू करण्यात आला. त्यामुळे कालवा लगतच्या शेतकऱ्यांसह गोमंतकीयांना लागलेली पाण्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे.
कुडासे धनगरवाडी येथे तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याने गोव्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे गोव्याच्या डिचोली व पेडणे तालुक्याला होणारा तिलारीचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्याचा विपरीत परिणाम तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबरच गोव्यातील वायंगणी भातशेती आणि तेथील जलशुद्धीकरण प्रकल्पांवर झाला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेतली होती. तर त्यांच्याच सरकारमधील जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच तिलारी धरणाला भेट देऊन अधिकाऱ्यांकडून कालवा दुरुस्तीच्या कामाची परिस्थिती जाणून घेतली होती.
फुटलेल्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर सोमवारी अकराव्या दिवशी डाव्या कालव्याच्या डागडुजीचे काम पूर्ण करून गोव्याला पाणी सोडण्यात आले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हे पाणी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे.