महान पौराणिक नाटक 'सं. मत्स्यगंधा'ला उदंड प्रतिसाद !

५ वर्षांनी 'नाथ पै'त घुमले नाट्य संगीताचे सूर
Edited by:
Published on: February 16, 2025 12:27 PM
views 269  views

सावंतवाडी : सावंतवाडीतील बॅ. नाथ पै सभागृहात तब्बल ५ वर्षांनी संगीत नाटकाचे सूर घुमले. प्रा. वसंत कानेटकर लिखित महान पौराणिक नाटक 'संगीत मत्स्यगंधा' या नाट्याचे स्थानिक कलावंतांनी अप्रतिम असं सादरीकरण केलं. रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद या संगित नाटकास लाभला. महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाची घटना यात मांडली असून संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असा हा नाट्यप्रयोग होता. 

क्षितिज इव्हेंट आयोजित नाट्यमेळा सावंतवाडी प्रस्तुत श्री परमेश्वर निर्मित व प्रा.वसंत कानेटकर लिखित संगीत 'मत्स्यगंधा नाटक' शनिवारी बॅ. नाथ पै. सभागृह सावंतवाडी येथे संपन्न झाले. तब्बल पाच वर्षांनी सावंतवाडीच्या बॅ. नाथ पै स्थानिक कलावंतांच्या नाट्य संगीताचे सूर घुमले.दीपप्रज्वलनाने या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली. यावेळी क्षितीज इव्हेंटचे लक्ष्मण नाईक, हर्षवर्धन धारणकर, संदीप धुरी, वैभवी पुराणिक, प्रदीप जोशी, पावन चोडणकर आदी उपस्थित होते. प्रारंभी नाट्यकर्मी प्रवीण मांजरेकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

महाभारतातील हे कथानक देवव्रत अर्थात भीष्माचार्य आणि त्यांच्या वडिलांची अर्थात राजा शंतनूची पत्नी सत्यवती अर्थात मत्स्यगंधा ह्यांच्या जीवनात नेते. पराशर मुनींवर प्रेम करणारी सत्यवती प्रेमभंगामुळे निष्ठुर होते. तिच्या निष्ठुर सूडबुद्धीचे अतिशय घातक परिणाम तिच्यासह देवव्रताला आणि सत्यवतीसह अनेकांना भोगावे लागतात. फार गहन आशयाचे हे कथानक असून अप्रतिम संगीत आणि संवादांनी परिपूर्ण असे हे नाटक आहे. याच उत्तम सादरीकरण बॅ‌. नाथ पै सभागृहात करण्यात आलं. रसिकांची भरभरून दाद त्याला मिळाली. यातील साद देती हिमशिखरे, गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी, जन्म दिला मज ज्यांनी, देवाघरचे ज्ञात कुणाला आदी नाट्यपदांचं अप्रतिम सादरीकरण स्वप्निल गोरे, केतकी सावंत यांनी केले. संगीत मत्स्यगंधा’ हे प्रा. वसंत कानेटकर लिखित असून पं. जितेंद्र अभिषेकी यांंनी या नाटकाला संंगीत दिले होते. महाभारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना या नाटकात मांंडण्यात आली आहे. सावंतवाडी येथील नाट्यप्रयोगात सत्यवतीची भुमिका केतकी सावंत, पराशर - स्वप्निल गोरे,भिष्म - बाळ पुराणिक,चंडोल - गणेश दिक्षित,शंतनू - योगेश प्रभू,अंबा - उमा जडये, धीवर - आशुतोष चिटणीस, प्रियदर्शन - तेजस प्रभू देसाई यांनी अप्रतिम भुमिका सादर केल्या. या नाटकाचे 

दिग्दर्शन बाळ पुराणिक यांनी केले. स्थानिक कलावंतांची निर्मिती असलेल्या या संगीत नाटकात उमेश कोंडये, संजय जोशी, वैभवी पुराणिक, गणेशप्रसाद गोगटे, रावजी पार्सेकर यांच सहकार्य लाभलं. तसेच मंत्रमुग्ध करणाऱ्या नाट्यपदांना ऑर्गन साथ प्रसाद शेवडे व तबला साथ निरज भोसले यांनी केली. अंकाच्या समाप्तीवेळी बाळ पुराणिक यांनी रसिकांचे आभार व्यक्त केले. संगीत नाटक जपण्याचं काम आम्ही करत असून येत्या वर्षांत नव्या संगीत नाटकासह आपल्या भेटीला येऊ असे प्रतिपादन केले.