
सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे.
या समीतीवर अॅड पार्सेकर यांनी यापूर्वीही प्रभावी काम केलेले असून जिल्ह्यातील वीज वितरण, टेलीफोन, एसटी महामंडळ, वैद्यकीय तसेच जिल्ह्यातील पुरवठा विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले होते. ग्राहकांची होणारी फसवणूक आणि त्याबाबत ग्राहकांना त्यांच्या ग्राहक संरक्षण कायद्यानुसार मिळालेले अधिकार याबाबत जिल्हास्तरावर जनजागृती कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असतो. महिला व बालकांच्या प्रश्नासाठीही ते अनेक वर्षे कार्यरत असून महिला समुपदेशनचे संचालक, चाईल्ड लईनचे संचालक, पर्यटन व्यवसायिक महासंघाचे कार्यवाह, नवीन अखिल भारतीय माथाडी कामगार, मुंबईचे उपाध्यक्ष, नसिमा हुरजूक यांच्या अपंगासाठी काम करणाऱ्या साहस या संस्थेचे विश्वस्त, एम्. आय्. डि. सी. इंडस्ट्रीज असो. कुडाळचे कार्यवाह, सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असो. सिंधुदुर्गचे संघटनमंत्री,अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशा विविध संस्थावर कार्यरत असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे समाजातील विविध संस्था व त्यांच्या अनेक हितचिंतकाने त्यांचे अभिनंदन केले आहे.