
दोडामार्ग : हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण महिन्यातील श्री देव नागनाथ तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्रीला होणारा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी तालुका प्रशासन आणि स्थानिक देवस्थान सल्लागार समिती यांची संयुक्त नियोजन बैठक नागनाथ मंदिरच्या ठिकाणी पार पडली. तालुक्याचे प्रशासन प्रमुख तथा तहसीलदार अरुण खानोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, देवस्थान समितीचे अध्यक्ष देऊ गवस व सरपंच सौ. गवस यांच्या प्रमुख उपस्थिती ही बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीस महसूल विभागाकडून स्वतः तहसीलदार अरुण खानोलकर यांच्या समवेत नायब तहसीलदार सत्यवान गवस मंडल अधिकारी सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश जाधव, वीज वितरणचे शाखा अभियंता गुरुदास मोरे, एसटी प्रशासनाचे आगार प्रमुख नरेंद्र बोधे, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच देवस्थान समितीचे पदाधिकारी मनोहर गवस, भरत गवस, सखाराम सडेकर, रामा गावस, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, प्रवीण गवस, परेश ठाकूर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत जत्रेत भाविकांना श्री नागनाथ देवाचे दर्शन कोणत्याही गैरसोय विना घेता यावे याबाबत चर्चा करून खास नियोजन करण्यात आले. देवस्थान समितीचे अध्यक्ष देवगवस यांनी महाशिवरात्री उत्सव कशा पद्धतीने संपन्न होणार, याची सुरुवातीला प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर पोलीस प्रशासन, एसटी प्रशासन, वीज वितरण, आरोग्य विभाग यांनी कशा पद्धतीने सज्ज असलं पाहिजे याबाबत सविस्तर चर्चा झाली.
जत्रोत्सवासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक पोलीस फाटा व 20 होमगार्ड, एसटी प्रशासनाकडून खास 4 एसटी बसेस, तर वीज वितरण कडून दोन वायरमन व आपत्ती व्यवस्थापन साठी महसूल कडून प्रशिक्षित स्वयंसेवक आणि सोनावल हायस्कूलच्या सहकार्याने यात्रोत्सव सुरळीत पाडण्याचे नियोजन करण्यात आले. महसूल प्रशासन देवस्थान कमिटीला सर्वतोपरी सहकार्य करणार करणार असून बाकी सर्व डिपार्टमेंटने आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असे आव्हान तहसीलदार खानोलकर यांनी केले.
तिलारी ते तेरवण मेढेपर्यंत दोडामार्ग विजघर राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. मात्र महाशिवरात्रीच्या तोंडावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता अनिल बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूळस ते तिलारीपर्यंत रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात आले असून रस्त्याची साईडपट्टी सुद्धा साफसफाई करण्यात आली आहे. तसेच यात्रोत्सवापूर्वी भेडशीपर्यंत रस्ता खड्डे मुक्त करण्याचे नियोजन बांधकाम खात्याचे असल्याची माहिती अनिल बडे यांनी दिली असल्याने यावर्षी संपूर्ण तालुक्यातील शिवभक्तांना यात्रोत्सव खड्डे मुक्त प्रवास करून साजरा करता येणार आहे.