
सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, उद्योजक - पत्रकार यांची संयुक्त बैठक
दोडामार्ग : आडाळी एमआयडीसीतील भूखंड वाटप प्रक्रिया रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात रविवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील सरपंच, पत्रकार व उद्योजक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, ही माहिती सरपंच तसेच समिती अध्यक्ष पराग गावकर आणि सचिव प्रवीण गावकर यांनी दिली.
गेल्या दोन वर्षांत सुमारे ५० हून अधिक उद्योजकांनी आडाळी येथे भूखंड खरेदी केले असून, आणखी अनेक उद्योजक उद्योग उभारणीसाठी उत्सुक आहेत. मात्र महामंडळ प्रशासनाकडून बांधकाम आराखड्यांना मंजुरी देण्यात टाळाटाळ केली जात आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठीची विंडो अद्यापही उघडलेली नाही. परिणामी, अनेक उद्योजकांचा संयम सुटला असून त्यांनी “आमची गुंतवणूक अडकली आहे” अशी नाराजी व्यक्त केली आहे.
काही उद्योजकांनी भूखंडाचा पूर्ण मोबदला भरल्यानंतरही सहा-सहा महिन्यांपासून त्यांना भूखंडाचा ताबा देण्यात आलेला नाही. महामंडळाच्या मनमानी कारभारामुळे उद्योजकांचे आर्थिक नुकसान होत असून, आडाळी औद्योगिक क्षेत्राबाबत उद्योजकांमध्ये नकारात्मकता वाढत आहे. ही परिस्थिती जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी व रोजगार निर्मितीसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे समितीने म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर कृती समितीने आडाळीत उद्योजक, सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सरपंच, पत्रकार तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांची एकत्रित बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध नोंदवून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यात येणार आहे.
बैठकीस रविवारी दुपारी ३ वाजता सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समिती अध्यक्ष पराग गावकर व सचिव प्रवीण गावकर यांनी केले आहे.










