व्यसनमुक्तीच्या कोकण ब्रँड अम्बेसेडरपदी अभिनेत्री अक्षता कांबळी

नशाबंदी मंडळाच्या कणकवलीतील तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप
Edited by:
Published on: June 08, 2024 14:25 PM
views 267  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नशाबंदी मंडळाच्या राज्यातील सर्व जिल्हा संघटक, समन्वयकांची तीन दिवशीय कार्यशाळा कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे उत्साहात पार पडली. आगामी वर्षभरासाठी नशाबंदी मंडळाच्या कामाची रूपरेषा यावेळी ठरविण्यात आली. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी व्यसनमुक्तीचे कार्य, प्रचार आणि प्रसार जोमाने करण्यासाठी प्रसिद्ध मालवणी अभिनेत्री अक्षता कांबळी यांची कोकणातील व्यसनमुक्तीचा ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास यांनी शनिवारी केली.

महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाला ६५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त नशाबंदी मंडळाची आगामी वाटचाल ठरविण्यासाठी राज्यातील सर्व विभागातील नशाबंदी मंडळाचे संघटक आणि समन्वयकांची कार्यशाळा गोपुरी आश्रम कणकवली येथे पार पडली. यावेळी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र येथून नशाबंदी मंडळाचे संघटक उपस्थित होते. या कार्यशाळेच्या समारोपाला प्रमुख पाहूणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंती अजयकुमार सर्वगोड उपस्थित होते. यावेळी नशाबंदी मंडळाच्या राज्याध्यक्ष वर्षा विद्या विलास, नशाबंदी मंडळाचे सचिव अमोल मडामे, गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, नशाबंदी मंडळाच्या कोकण संघटक अर्पिता मुंबरकर, नशाबंदी मंडळाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य पत्रकार महेश सरनाईक आदी उपस्थित होते. अमोल मडामे यांनी प्रास्ताविकामध्ये व्यसनमुक्तीच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अक्षता कांबळी यांनी यावेळी मालवणी भाषेत संवाद साधत उपस्थितांची वाहवा मिळविली. महेश सरनाईक यांनी नशाबंदी मंडळाच्या उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

नशाबंदी मंडळाचे कार्य विस्तारणार : वर्षा विद्या विलास

मंडळाच्या अध्यक्षा वर्षा विद्या विलास यांनी व्यसनमुक्ती मंडळाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. आगामी काळात कोकणात विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नशाबंदी मंडळाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठीची रणनिती ठरविण्यात आली. नव्याने निवडून आलेल्या राज्यातील सर्व ४८ खासदारांची भेट घेऊन या कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुटुंब, पिढी घडविण्याचे काम कौतुकास्पद : अजयकुमार सर्वगोड

यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणाले, व्यसनमुक्त समाजासाठी नशाबंदी मंडळाचे सुरू असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कुटुंब आणि पिढी घडविण्याचे काम हे मंडळ गेली ६५ वर्षे करीत आहे. त्यामुळे या मंडळाला राजाश्रय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रतिकूल परिस्थितीत जे काम सुरू आहे त्या कार्याला सलामच ठोकला पाहिजे.